जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा गोंदियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 09:33 PM2018-12-23T21:33:09+5:302018-12-23T21:33:48+5:30

देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते.

Worldwide treatment facility in Gondia | जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा गोंदियात

जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा गोंदियात

Next
ठळक मुद्देशरद पवार : रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते. मात्र विदेशात कॅन्सरच्या उपचारासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे तेच महाष्ट्रात रिलायन्सच्या कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे गोंदियासह या परिसरातील रुग्णांना जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल गोंदिया येथे सुरू करण्यात आले. रविवारी (दि.२३) या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी खा.प्रफुल्ल पटेल, खा.मधुकर कुकडे, अंबानी समुहाच्या टिना अंबानी, आ.गोपालदास अग्रवाल, प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, अनिल देशमुख, माजी आ.राजेंद्र जैन, अनिल बावनकर, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, अनमोल अंबानी, डॉ.कौस्तव तलपात्रा, रिलायन्स हॉस्पीटलचे कार्यकारी निर्देशक राम नारायण उपस्थित होते.
पवार म्हणाले, कॅन्सर या आजारा बद्दल इतरांपेक्षा मला अधिक माहिती आहे. कारण मी स्वत: आजारातून गेलो आहे. जवळपास ३६ वेळा रेडीयशन घेतल्याने आता पूर्णपणे मी बरा आहे. जीवनात वाईट गोष्टींची सवय टाळा, तंबाखू, पान, खर्रा खाऊन नका. कॅन्सर विरुध्द लढा उभारण्याचे आवाहन केले. पटेल म्हणाले, माझ्यासाठी हा कार्यक्रम भावनिक आहे. अंबानी समुहाने गोंदिया येथे दर्जेदार आणि सर्व आधुनिक सोयी सुविधा असणारे कॅन्सर केअर हॉस्पीटल सुरू केल्याने गोंदिया-भंडारा जिल्ह्यांसह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील रुग्णांना सुध्दा याचा उपयोग होणार आहे. मुंबईपासून हजारो कि.मी.अंतरावर आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यात हे हॉस्पीटल सुरू केल्याबद्दल मी टिना अंबानी यांचा आभारी आहे. अलीकडे कॅन्सरवरील उपलब्ध उपचार पध्दती हे या क्षेत्रातील क्रांती आहे. अंबानी समुहाने गोंदिया येथे कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटलच्या धर्तीवर पुन्हा एक हॉस्पीटल उभारण्याचा आग्रह टिना अंबानी यांच्याकडे धरला.
टिना अंबानी म्हणाले काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गोंदिया येथे आले होते. तेव्हा विमानातून या शहराचे सौंदर्य पाहुन मी शहराच्या प्रेमात पडले आणि तेव्हाच येथे कॅन्सर केअर हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला. माझा जन्म जरी गुजरातमध्ये झाला असला तरी महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे. ज्या भूमीने आपल्याला सर्वकाही दिले. तिला सुध्दा काही परत देण्याची जबाबदारी आपली सुध्दा आहे. याच भावनेने महाराष्ट्रात तीन ठिकाणी कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर केअर हॉस्पीटल सुरु केले.या हॉस्पीटलच्या माध्यमातून जगातील दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही टिना अंबानी यांनी दिली. कॅन्सर विरुध्द लढा उभारण्याचा सर्वजण संकल्प करुन चला सगळे कॅन्सरला कॅन्सल करण्याचा संकल्प करू या असे आवाहन टिना अंबानी यांनी केले.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करणार
गोंदिया जिल्ह्यात नवेगाबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्प व हॉजराफॉलसारखी पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करुन त्यांचे सौंदर्य अधिक खुलविणार असल्याची ग्वाही टीना अंबानी यांनी या वेळी दिली.

Web Title: Worldwide treatment facility in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.