गोंदियात मदतीला धावून जाणारा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:04 PM2018-03-17T12:04:05+5:302018-03-17T12:04:12+5:30

सोशल मिडिया व व्हॉट्सअ‍ॅपचा योग्य उपयोग करीत लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम गोंदिया शहरातील एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मागील वर्षभरापासून करीत आहे.

Whatsapp Group, which runs to help Gondia | गोंदियात मदतीला धावून जाणारा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

गोंदियात मदतीला धावून जाणारा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Next
ठळक मुद्देसोशल मिडियाचा योग्य वापरसर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अलीकडे सोशल मिडियाचा दूरउपयोग केला जात असल्याने याबद्दल चिंता व्यक्ती केली जात आहे. काहीजण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करुन घेत असल्याचे चित्र आहे. मात्र सोशल मिडिया व व्हॉट्सअ‍ॅपचा योग्य उपयोग करीत लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम गोंदिया शहरातील एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मागील वर्षभरापासून करीत आहे. त्यामुळे मदतीला धावून जाणारा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अशी त्याची ओळख हळूहळू निर्माण होत आहे.
सोशल मिडियाचा योग्य उपयोग केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. ही बाब हेरुन गोंदिया शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत मंडळीनी एकत्र येऊन ‘गोंदिया विधानसभा’ नावाने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला.
या ग्रुपच्या नावामुळे सुरूवातीला हा ग्रुप कुठल्यातरी राजकीय पक्षाशी निगडीत असावा असे वाटले. मात्र काही कालावधीनंतर प्रत्त्यक्षात तसे काहीच नसल्याचे जाणवले. या ग्रुपमध्ये युवकांपासून ते अबालवृध्दांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, राजकारणी, वैद्यकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, व्यापारी वर्ग, विविध संघटनाचे पदाधिकारी, पत्रकार यांचा सुध्दा या गु्रपमध्ये समावेश आहे.
कोणताही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप म्हटले की त्यावर गुड मार्निंग, गुड नाईटच्या संदेशासह दिवसभर जोकचे मॅसेज सुरू असतात. त्यामुळे बऱ्याच ग्रुपमधील सदस्य ते उघडून देखील पाहत नाही. मात्र हा सर्व प्रकार ‘गोंदिया विधानसभा’ग्रुपवर फारच अभावाने दिसतो. ग्रुपवर अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी आचार संहिता तयार केली आहे. या ग्रुपवर शहरात होणाºया सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आयोजनाची माहिती दिली जाते.
शिवाय शहरातील ज्वलंत विषयांना घेवून या ग्रुपवर बरेचदा चर्चा देखील रंगते. ही चर्चा कधीकधी टोकाला सुध्दा जाते. काहीजणांना कधी कधी ते पटत देखील नाही. मात्र असे असले तरी शहरात कुठे आगीची घटना असो वा अपघात घडला असो त्याची माहिती या ग्रुपवर मिळताच या ग्रुपचे सदस्य एकमेकांना मॅसेज करुन त्या ठिकाणी पोहचण्यास सांगतात. सदस्य पोहचले की नाही संबंधिताना मदत मिळाली की नाही याची माहिती सातत्याने घेत असतात.
एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असल्यास या ग्रुपवर तो संदेश टाकला जातो तसेच ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. ऐवढच नव्हे मागील महिन्यात बाई गंगाबाई महिला रुग्णालयात रात्रीच्या वेळेस एका गरीब रुग्णाला दाखल करुन घेण्यास व त्याच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. तेव्हा गु्रपच्या सदस्यांनी रुग्णालयात पोहचत संबंधित रुग्णाला भर्ती करुन त्याच्यावर उपचार करायला लावले. तर रेल्वे रुळालगत एक जीवंत अर्भ्रक सापडले होते. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करुन त्याच्या उपचाराची जबाबदारी घेतली.
येथेच या ग्रुपचे कार्य थांबत नाही तर स्वच्छता अभियान असो वा शहरातील रस्त्यावरील खड्डे असो हे विषय देखील या ग्रुपने लावून धरले. ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील मंडळीचा समावेश असल्याने संबंधिताना वेळीच मदत मिळण्यास देखील मदत होत आहे. त्यामुळे खरोखरच सोशल मिडियाचा उपयोग सोशल कार्यासाठी हा ग्रुप खऱ्या अर्थाने करीत आहे. या ग्रुपचा प्रमुख म्हणून कुणा एकाचे नाव टाकल्यास ते वावगे होणार नाही कारण ग्रुपमधील सर्व सदस्य एकत्र येऊन कार्य करीत असल्याने त्यांना गोंदिया विधानसभा ग्रुप हेच नाव योग्य आहे. या व्हॉट्सग्रुपपासून इतर ग्रुपने देखील कार्य केल्यास सोशल मिडियाचा खरा उपयोग समाजाच्या विकासासाठी होईल.

Web Title: Whatsapp Group, which runs to help Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.