Three injured in Randukar attack | रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी

शहरात शिरुन केला हल्ला : जखमी रुग्णालयात दाखल
सालेकसा : पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेणाऱ्या रानडुकराने रविवारी (दि.१६) शहरात शिरून तिघांना जखमी केल्याची थरारक घटना घडली. विशेष म्हणजे भर चौकात एका ३६ वर्षीय युवकाला आणि त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात ४ वर्षाच्या मुलाला सकाळी ११ वाजता दरम्यान रानडुकराने जखमी केले. जितेंद्र जांभुळकर (३६) आणि सार्थक खेमराज हरकंडे (४) असे जखमींचे नाव असून त्या दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.
बस स्थानक परिसरात मुख्य चौकावर जितेंद्र जांभूळकर आपल्या मोटरसायकलवर जात असताना शहरात शिरलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करून खाली पाडले व त्याच्या पाठीवर जखम केली. परिसरात दुकानदारांना प्रसंगी लक्षात येताच त्या युवकाला वाचविण्यासाठी धावले. रानडुकराने रेल्वे स्टेशन मार्गाने पळताना चार वर्षीय सार्थक हरकंडे याच्या माथ्यावर हल्ला करून जखमी केले.
सुनील असाटी व रिंकू शर्मा याच्या मदतीने त्या दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेऊन भर्ती करण्यात आले. तेथे त्यांच्या जखमेला टाके लावून उपचार करण्यात आला. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत पसरली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये या दिशेने वनविभागाने उपाय योजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महिला जखमी
परसवाडा येथे शेतात रबी पिकांचे निंदण करीत असलेल्या मिरन सूरज साडेपाच (४५) यांना रानडुकराने हल्ला करून जखमी केले. कि डंगीपार येथे ही घटना घडली असून महिलेला तिरोडा उप जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरन साडेपाच या शेतात निंदण करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. (तालुका प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.