जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:27 PM2018-05-27T22:27:31+5:302018-05-27T22:28:35+5:30

शहरातील जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला नगर परिषदेने सुरूवात केली आहे. कर विभागातील मोहरील सर्वेक्षण करीत असून यादी तयार करणार आहेत. मात्र बांधकाम विभागाचे काम कर विभागाच्या माथी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The start of survey of dilapidated buildings | जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरूवात

जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरूवात

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे काम कर विभागाच्या माथी : न.प.ला आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला नगर परिषदेने सुरूवात केली आहे. कर विभागातील मोहरील सर्वेक्षण करीत असून यादी तयार करणार आहेत. मात्र बांधकाम विभागाचे काम कर विभागाच्या माथी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी नगर परिषदेने जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण सुरू केल्याने उशीरा का होईना नगर परिषदेला जाग आल्याचे चित्र आहे.
जीर्ण इमारती पडून अनेकांचा बळी गेल्याची घटना मागील वर्षी मुंबई येथे घडली. अशा घटना दरवर्षी विविध भागात घडत असताना प्रशासन मात्र त्याची दखल घेत नाही. त्यामुळे एखाद्या घटनेला निमंत्रण दिल्याचे चित्र होते. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेतर्फे वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे. यंदा हीच बाब ओळखून नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश कर विभागाला दिले आहे. यासाठी विभागनिहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे, व गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते. नगर परिषदेत मात्र जीर्ण इमारतीच्या सर्वेक्षणावरुन एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू होता. नगर रचना विभागाकडे माहिती मागीतल्यास ते कर निर्धारण विभागाचे नाव सांगतात, कर निर्धारण विभागाकडे विचारणा केल्यास ते बांधकाम विभागाकडे बोट दाखवितात. यामुळे या विभागाची नेमकी जबाबदारी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला होता. मागील वर्षी मुख्याधिकारी पाटील यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जीर्ण इमारतींची यादी तयार केली होती. यंदा मात्र मागील वर्षी सारखा एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार टाळण्यासाठी मुख्याधिकारी पाटील यांनी कर विभागाकडे जीर्ण बांधकामांच्या सर्वेक्षणाचे काम दिले आहे. यांतर्गत कर विभागातील मोहरील त्यांच्याकडील परिसरातील जीर्ण इमारतींची यादी तयार करणार आहेत.त्यानंतर कर विभागातील मोहरीलने तयार केलेल्या यादीतील इमारतींचे बांधकाम व नियोजन विभागातील अभियंत्यांकडून पाहणी केली जाईल.यात जीर्ण झालेल्या इमारतींची अंतीम यादी तयार करून कारवाई केली जाणार आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याची दखल
शहरातील जीर्ण बांधकामांचा विषय ‘लोकमत’ लावून धरला होता. त्याचीच दखल घेत मागील वर्षी मुख्याधिकारी पाटील यांनी कर विभागाकडून जीर्ण इमारतींची यादी तयार करण्याचे काम करवून घेतले होते. यंदा आता मान्सून जवळ आला असून शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वेक्षणाला सुरूवात केल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्याचे सांगितले.
पालिकेचीच इमारत कोसळली होती
शहरातील इमारतींचे सोडाच मात्र मागील वर्षी नगर परिषदेचीच इमारत कोसळली होती. नगर परिषद कर विभाग पूर्वी ज्या इमारतीत होते ती इमारत मागील वर्षी पडली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नव्हती.
 

Web Title: The start of survey of dilapidated buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर