खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:01 PM2018-06-28T22:01:57+5:302018-06-28T22:02:08+5:30

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे.

Slaughter of trees under the name of Khot | खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

googlenewsNext
ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात जेसीबीचा वापर : नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. खोततळी तयार करण्याच्या नावावर संरक्षित वनपरिक्षेत्रातील जेसीबी लावून कटाई सर्रासपणे कटाई केली जात असल्याचा प्रकार नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सुरू आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पानवठे कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची गावांकडे भटकंती सुरु होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी व जंगलामध्ये वन्यप्राण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याकरीता वनविभागाने यावर्षीपासून खोततळे तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. खोततळे तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
यापैकी १५ लाख रुपयांची कामे मनरेगातंर्गत तर १० लाख रुपयांची कुशल कामे केली जात आहे. सध्या नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळी तयार करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वनविभागाने खोततळी तयार करण्याची कामे कंत्रादाराने दिली आहे. मात्र कंत्राटदारकडून खोततळी तयार करण्याच्या नावावर वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. हा सर्व प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे टाळले जात जात आहे.
नियमांचे सर्रास उल्लघंन
जंगलामध्ये खोततळे तयार करताना त्या क्षेत्रात वृक्ष असल्यास केवळ १० वृक्षांची कटाई करण्याचा शासनाचा जीआर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विभागाच्या नियमानुसार जागेची मौका चौकशी वृक्षांचा पंचनामा, वृक्षाची गोलाई, उंची मोजून कापण्याची परवानगी देऊन कटाई केलेल्या झाडाची लाकडे वन विभागाच्या आगारात जमा केली जातात. मात्र सध्या खोततळ्याच्या नावावर जेसीबी लावून वृक्षांना मुळासकट खोदून त्यांना जाळण्याचा प्रकार सुरू आहे.
मागील सहा महिन्यांपासून काम सुरू
नवेगावबांध वनपरिक्षेत्रात जानेवारी २०१८ पासून खोततळी तयार करण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. जिथे साधे खोदकाम करण्याची परवानगी नाही तिथे सुध्दा कंत्राटदार खोततळीचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सर्रासपण करीत आहेत. खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई केली जात असून या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.
कारवाईची जबाबदारी कुणाची
संरक्षित वनक्षेत्रात कुठलेही काम करताना त्याच्या काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघंन होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळीच्या नावावर सुरु असलेल्या वृक्षकटाईकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. तर काही वन अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असून देखील ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

Web Title: Slaughter of trees under the name of Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.