रौनक वैद्यच्या अपहरणकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:51 PM2019-07-10T21:51:16+5:302019-07-10T21:52:03+5:30

सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

Ranaak Vaidya's kidnappers arrested | रौनक वैद्यच्या अपहरणकर्त्यांना अटक

रौनक वैद्यच्या अपहरणकर्त्यांना अटक

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : खंडणीसाठी केले होते अपहरण, घटेगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रौनक आपल्या घरातून जिल्हा परिषद शाळा घटेगाव येथे जात होता. दप्तर शाळेत सोडून प्रार्थनेच्या वेळेला शाळेच्या बाहेर खेळत असताना सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी तुला तुझ्या वडिलांनी बोलावले आहे असे खोटे सांगून त्याला जबरदस्तीने अ‍ॅक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या सोनरी रंगाच्या गाडीवर बसवून नेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्यासोबत शिकणारा त्याच्या घराशेजारी राहणारा त्याचा वर्गमित्र रौनकचा दप्तर घरी घेऊन आला. रौनकला कुणीतरी दोन अनोळखी लोक जबरदस्तीने घेऊन गेले आहे असे त्याच्या आई-वडिलांना सांगितले.त्यानंतर रौनकचे आई-वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. त्यानंतर रौनकचे वडील गोपाल वैद्य यांनी सायंकाळी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे रौनकच्या अपहरणाची तक्रार केली. डुग्गीपार पोलिसांनी याप्रकरणी भांदवीच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी सदर घटेनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी लावून अपहरण झालेल्या मुलाचा तसेच संशयीत इसम व संशयीत वाहन याचा शोध घेण्याचे आदेश दिले. नियंत्रण कक्ष भंडारा यांना देखील याबाबत माहिती देऊन भंडारा जिल्ह्यात देखील नाकाबंदी करण्यात आली होती. त्याप्रमाणे संपूर्ण गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील लगेचच नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी कडक वाहन तपासणी मोहिम राबविली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक गोंदिया, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच देवरी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

तपासासाठी होते पाच पथक
विनिता शाहू यांनी घटनास्थळावरील साक्षदार यांच्याकडे विचारपूस करुन परिस्थिती जाणून घेतली. गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने अपहरण झालेल्या मुलाचा व संशयीताचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, देवरी उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पाच तपास व शोध पथके तयार केली होती. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी यांनी संपूर्ण रात्रभर प्रभावी शोध मोहीम राबविली. सदर घटनेनंतर गोंदिया पोलिसांनी दिलेला प्रतिसाद व प्रभावी शोध मोहीम याचा परिणाम म्हणून संशयीतांनी अपहरण झालेला रौनकला ४ जुलै २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान देवरी तालुक्यातील पुतळी गावाजवळील जंगल परिसरात रस्त्यावर सोडून ते फरार झाले होते.

या आरोपींना अटक
९ जुलै रोजी सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील वैभव प्रकाश वासनिक (२३), शेखर दुलीचंद शेंडे (२३), देवरी येथील प्रविण कैलाश पाटील (२२), राहूल नामाजी गावड (१९), सौरभ बाळकृष्ण गायधने (१९) या पाच जणांना नागपूर येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले.

Web Title: Ranaak Vaidya's kidnappers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.