ठळक मुद्देवेतन आयोगाची थकबाकी : दिवाळीतही केला अपेक्षाभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : साडेतीन कोटींच्या रकमेतून नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचारी व कंत्राटदारांना पैसे वाटप करून मेहरबानी दाखविली. अशात मात्र स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील थोडीही रक्कम देण्यात आली नाही. यामुळे नगर परिषदेतील स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांत चांगलाच रोष खदखदत आहे. नगर परिषदेतील काहीच कर्मचाºयांची दिवाळी आनंदात गेली असल्याची प्रतिक्रियाही आता या वर्गातून उमटत आहे.
नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे याबाबत शहरवासीयांना चांगलेच ठाऊक आहे. असे असतानाही नगर परिषदेचे बिनकामाचे खर्च काही कमी होत नाही. परिणामी नगर परिषदेच्या तिजोरीत आवक पेक्षा खर्च जास्त अशी स्थिती असते. यामुळेच नगर परिषदेला दिवाळी पूर्वी रोजंदारी कर्मचाºयांचा पगार, फेस्टीवल एडवांस व कंत्राटदारांचे बिल काढणेही अडचणीचे होते. अशात शासनाच्या एखाद्या योजनेतील निधीवर मिळालेली व्याजाची रक्कम वळती करून ती खर्च करण्याची येथील नगर परिषदेची प्रथा आहे. त्यानुसार यंदाही नगर परिषद प्रशासनाने साडे तीन कोटींची रक्कम उभी केली.
या साडे तीन कोटींच्या रकमेतून नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचाºयांचे दोन महिन्यांचे पगार काढले तसेच त्यांना फेस्टीवल एडवांस दिला. शिवाय चांगली मोठी रक्कम कंत्राटदारांच्या बिलांवर खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचाºयांचा पगार व त्यांना फेस्टीवल एडवांस देऊन चांगले काम केले यात शंका नाही. तर कंत्राटदारांचे बिल काढून त्यांचीही दिवाळी साजरी करण्यात मदत केली. असे असताना मात्र स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
त्याचे असे की, नगर परिषदेतील सुमारे ४०० स्थायी व ६०० सेवानिवृत्त कर्मचाºयांची पाच व सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी आहे. यात सहावा तर सोडाच पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील थोडीफार रक्कम तरी दिवाळीनिमित्त मिळणार या आशेत हे कर्मचारी होते. मात्र नगर परिषद प्रशासनाने त्यांना काहीच दिले नाही. परिणामी स्थायी व सेवानिवृत्त कर्मचारी सध्या नाराज दिसून येत आहेत.
परिषदेवर कोट्यवधींची थकबाकी
नगर परिषद कर्मचाºयांना पाचवा व सहावा वेतन आयोग लागू झाला आहे. या दोन्ही वेतन आयोगांची नगर परिषदेतील कार्यरत स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांची थकबाकी घेतल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते. आता एवढी रक्कम देणे नगर परिषदेला शक्य नाही. याकरिता थोडी-थोडी करून देणे अपेक्षित आहे. दिवाळी पूर्वी या कर्मचाºयांना काही तरी मिळणार अशी अपेक्षा असते. मात्र यंदा त्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील काहीच मिळाले नाही. अशात सहावा तर सोडाच असे कर्मचारी म्हणत आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन अध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी मागील दिवाळीत स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना थोडी-थोडी रक्कम दिली होती असेही कळले.
सेवानिवृत्त कर्मचारी गेले न्यायालयात
नगर परिषदेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात उशिर होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाºयांसाठी ही रक्कम गरजेची आहे. त्यामुळे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी न्यायालयात गेले असल्याचीही माहिती आहे.