खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:07 AM2018-12-11T00:07:28+5:302018-12-11T00:08:19+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे.

Lading basis for the purchase center | खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

Next
ठळक मुद्देनुकसानीची शक्यता : गोदामांची अद्यापही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे. अवकाळी पावसामुळे धान ओला होऊन नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो.
आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र दरवर्षी या विभागातर्फे खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षीत ठेवण्यासाठी गोदामाची अडचण कायम असते. आठ वर्षांपूर्वी खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र यानंतरही शासनाने कसलाच धडा घेतलेला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ४६ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या केंद्रावरुन २ लाख ४९ हजार ९५७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान गोदामाअभावी खरेदी केंद्रावरच पडला आहे. धानाच्या सुरक्षेकरीता ताडपत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. पावसामुळे काही केंद्रावरील धान ओले झाल्याची माहिती आहे.
मात्र या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून गोदामाची व्यवस्था लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.
दरवर्षी अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भिजतात. मात्र यानंतरही केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था करण्याचा विसर या विभागाला पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नुकसान झाल्यावर दखल घेणार का?
आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था केली जात नाही. परिणामी खरेदी केलेला लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी या विभागाला लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागते. मात्र यानंतरही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नुकसान झाल्यावर दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांना कोण देणार नुकसान भरपाई?
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच बारदाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खरेदी केंद्रावर शेड अथवा पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांची सोय नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयीेंना तोंड द्यावे लागत आहे. धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचे धान काटा करण्यापूर्वीच भिजल्यास त्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बारदाण्याअभावी धान उघड्यावर
आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाण्याची समस्या सुटली नाही. परिणामी शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानाला सुध्दा बसल्याची माहिती आहे.

Web Title: Lading basis for the purchase center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.