दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:47 PM2018-06-15T21:47:48+5:302018-06-15T21:47:48+5:30

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली.

Inaccessible Jatbharda got ideal village | दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम

दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतला भेट : आदर्श ग्रामचे पोपटराव पवार यांंची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली. त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.
पोपटराव पवार यांनी बुधवारी (दि.१३) जेठभावडा ग्रामपंचायतला भेट देवून गावाची पाहणी केली. तसेच येथील लोकांशी संवाद साधला. लोकांची हिरहिरीची भूमिका पाहून ते मंत्रमुग्ध झाले. या ग्रामपंचायतची विकासाकडे होणारी वाटचाल बघून जेठभावडा ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची घोषणा ग्रामसभेत केली. प्राप्त माहितीनुसार पवार यांनी गुरुवारी (दि.१४) जेठभावडा ग्रा.पं.ला भेट देणार असल्याचे कळविले होते. मात्र त्यांनी अचानक एक दिवस आधी म्हणजे बुधवारी आपल्या चमूसह भेट देवून ग्रामपंचायत व गावाची पाहणी केली. ग्रामपंचायतने त्वरीत ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेत ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकांना बोलविण्यात आले. पवार यांच्यासह कृषी संचालक तथा आदर्श गाव प्रकल्प पुणेचे निंबाळकर, देवरी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी सहायक प्रवीण मेश्राम, धानगाये, सरपंच उमेदसिंग दुधनाग, उपसरपंच शालीनी देसाई, सदस्य ममीता धनगून, सरिता आचले, आम्रपाली साखरे, प्रिया राऊत, राजेश सलामे, खुशाल किरसान, आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित माजी सरपंच व सदस्य डॉ.जे.टी. रहांगडाले, माजी उपसरपंच व सदस्य भोजराज गावडकर व ग्रा.पं. सचिव वाय.बी. कटरे व माजी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांच्यासह गावकरी उपस्थित होते. ग्रामसभेच्या माध्यमातून पवार व त्यांच्या चमूने गावकऱ्यांशी संवाद साधला. गावातील लोकांची गावाला विकासाची तळमळ पाहुन लोकांची प्रशंसा करुन कौतुक केले. ग्रामसभेत आदर्श ग्रा.पं.करीता ठराव घेवून देवराज वडगाये यांच्या एन.जी.ओ.मार्फत आदर्श ग्राम प्रकल्पाकडे प्रस्ताव सादर केले. यावेळी पवार व त्यांच्या चमूने लोकांच्या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले. या ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव पारित केला. तसेच जेठभावडा ग्रा.पं.आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. प्रास्ताविक व संचालन माजी सरपंच व सदस्य डॉ.जे.टी. रहांगडाले यांनी केले. आभार सचिव वाय.बी. कटरे यांनी मानले.

शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आदर्श ग्राम या उपक्रमाकरिता जेठभावडा ग्रा.पं.चा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावरुन या ग्रा.पं.चे मुल्यमापन करण्यासाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प राज्यस्तरीय समितीने १३ जून ला जेठभावडा ग्रा.पं.ला भेट देवून पाहणी केली. लोकांचा उत्साह पाहून या समितीने ग्रामसभेतच या ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची तोंडी घोषणा केली. याबाबतचे पत्र नंतर येणार आहे.
-मनोज हिरुळकर,
गटविकास अधिकारी,
पं.स. देवरी, जि. गोंदिया

Web Title: Inaccessible Jatbharda got ideal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.