शेतकरी पीक कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:07 AM2018-07-20T00:07:32+5:302018-07-20T00:09:40+5:30

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

 Farmer deprives the crop loan | शेतकरी पीक कर्जापासून वंचित

शेतकरी पीक कर्जापासून वंचित

Next
ठळक मुद्देयाद्यांनी वाढविली चिंता : बँका उद्दिष्टापासून लांबच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. खात्यावरील आधीचे कर्ज शून्य न झाल्याने बँका नवीन पीक कर्ज देण्यास टाळटाळ करीत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७० हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. यासाठी शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना एकूण २७६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. मात्र जुलै महिना अर्धा संपला असताना बँकानी अद्यापही पीक कर्ज वाटपाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट पूर्ण केले नाही.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आत्तापर्यंत १९ हजार २२० शेतकऱ्यांना ७३ कोटी रुपयांचे तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकानी केवळ ३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.
जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकानी वाटप केलेल्या पीक कर्जाची बेरीज केल्यास ११० कोटी रुपयांच्या पलिकडे हा आकडा जात नाही. त्यामुळे बँकाना पीक कर्जाचे अर्धे सुध्दा उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी असून दरवर्षी यापैकी ७० ते ८० हजार शेतकरी पीक कर्जाची उचल करतात. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात होवून दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर केवळ २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया किती गतीने सुरू आहे याची कल्पना न केलेली बरी. राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवून देखील पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बँका आमचे काम सुरळीत सुरू असल्याचा दावा करीत आहे. पीक कर्ज वाटपाचे पाणी नेमके कुठे मुरत आहे हे न समजण्यापलीकडे आहे.
महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांची दहावी ग्रीन यादी अद्यापही बँकाना महाआॅनलाईनकडूृन प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्जाची रक्कम शून्य होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देता येत नाही. तर शेतकऱ्यांनी थकीत कर्ज भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. दरम्यान महाआॅनलाईनकडून याद्या प्राप्त पाठविण्यास विलंब होत असल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.
पीक कर्ज वाटप मेळावे नावापुरतेच
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे, त्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ येवू नये, यासाठी बँकातर्फे तालुका स्तरावर पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. मात्र यानंतर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकाना गाठता आले नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटप मेळावे घेवून बँकानी नेमके काय साध्य केले असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
त्या शेतकऱ्यांचे काय
कर्जमाफीच्या ग्रीन यादीत शेतकऱ्यांची नावे नसताना त्यांची दिशाभूल करुन थकीत कर्जाची रक्कम भरायला लावण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार, बोदलकसा, सुकडी डाकराम या गावांमध्ये घडला. मात्र आता या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत नसल्याने व जवळ असलेली सर्व जमापुंजी व उधार उसनवारी करुन कर्जाची रक्कम भरली. आता नवीन पीक कर्ज मिळणार नसल्याने खरीप हंगाम करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title:  Farmer deprives the crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.