ठळक मुद्देनागरिकांची होते फरफट : लोकप्रतिनिधी व एस.टी. महामंडळाची वक्रदृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया या सारख्या योजना राबवून शहरांचा विकास झाला. मात्र अजूनही नक्षलग्रस्त आदिवासी ग्रामीण भागाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अद्यापही अर्जुनी-मोरगाव या तालुका स्थळाची जिल्हा मुख्यालयाशी नाळ जुळलेली नाही. महाराष्टÑातला हा असा एकमेव तालुका असल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन १ मे १९९९ रोजी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. अर्जुनी-मोरगाव हा आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. हे गोंदिया जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचे तालुका मुख्यालय आहे. येथून भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्हा मुख्यालयाचे अंतर ८० किमी. आहे. येथून भंडारा जिल्ह्यासाठी थेट व इतर तालुक्यांना जोडणाºया अनेक बसेस आहेत. मात्र गोंदिया जिल्हा मुख्यालयाशी जोडणारी एकही बस उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे याच मतदारसंघातून निवडून राज्य शासनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आहेत.
अर्जुनी-मोरगाव हे तालुकास्थळ गोंदिया-बल्लारशाह या रेल्वे मार्गावर आहे. मात्र अपुºया गाड्या व जनतेच्या दृष्टीने गैरसोईचे वेळापत्रक यामुळे जनता कंटाळली आहे. येथील जनतेचा जिल्हा मुख्यालयाशी दैनंदिन संपर्क असतो. मात्र एकही बसफेरी उपलब्ध नाही. रेल्वे दुपारी १२ वाजता गोंदियाला पोहोचते. तत्पुर्वी गोंदिया येथे जाण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे कामकाजाच्या निमित्ताने जाणारे लोक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापाºयांची चांगलीच तारांबळ उडते.
अर्जुनी-मोरगाव तालुका जंगलव्याप्त व विस्तीर्ण आहे. तालुक्यात १३६ आबादी गावे आहेत. ‘गाव तिथे एस टी’ हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रिद आहे. मात्र अद्यापही अनेक गावात एस.टी. पोहोचलीचं नाही. तालुक्यात बहुतांश रस्ते पक्के मार्ग व बारमाही वाहतूक होईल असे आहेत. मात्र अद्यापही अनेक गावे तालुका मुख्यालयाशी सुद्धा जुळलेली नाहीत. याचा गैरफायदा घेत अवैध वाहतूक जोमात आहे. अर्जुनी-मोरगाव ते गोंदिया तसेच अर्जुनी-मोरगाव ते जिल्ह्यातील इतर तालुकास्थळे जोडणाºया सबसेवा सुरु करण्यासंबंधाने तालुक्यातील सुज्ञ नागरिकांची आमदार, खासदार, मंत्र्यापासून एस.टी. महामंडळाच्या अधिकाºयांना १५ एप्रिल रोजी स्थानिक पंचायत समितीच्या ठरावासह निवेदन दिले. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
समृद्ध तालुका
अर्जुनी-मोरगाव हा पर्यटन, व्यवसाय, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या गोंदिया जिल्ह्यातील अग्रणी तालुका आहे. मात्र राजकीयदृष्ट्या दुर्लक्षीत आहे. येथील धानाचा व्यापार सर्वदूर प्रसिद्ध आहे. तालुक्यात २८ राईस मिल असून त्या गोंदिया बाजारपेठेशी संलग्नीत आहेत. गोठणगाव येथे महाराष्टÑातील एकमेव शरणार्थी तिबेटीयनांची वसाहत आहे. अरुणनगर, गौरनगर, रामनगर, संजयनगर, दिपकनगर तसेच पुष्पनगर ‘अ’ व ‘ब’ या आश्रीत बंगाली बांधवांच्या वसाहती आहेत. नवेगावबांध राष्टÑीय उद्यान, प्रतापगड, इटियाडोह धरण, झाशीनगर उपसा सिंचन योजना हे तालुक्याचे वैभव आहे. मात्र एवढे सारे काही असूनही या तालुक्याची नाळ गोंदिया जिल्हा मुख्यालय तसेच इतर तालुकास्थळाशी थेट बारमाही एस.टी. बसच्या माध्यमातून जुळलेली असू नये याचे नवल वाटते.
महामंडळाचा महागडा सल्ला
अर्जुनी-मोरगाव ते सडक-अर्जुनी या मार्गावर अनेक वेळा बस सुरु करुनही फेºयांना प्रवासी नसल्याने नाईलाजास्तव वाहतूक बंद करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव ते साकोली दरम्यान दिवसभरात एकूण १५ नियमित फेºया व मानव विकास सेवेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींच्या सोयीसाठी ७ फेºयांची वाहतूक सुरु आहे. तसेच साकोली ते गोंदिया जिल्ह्याच्या इतर तालुक्यात जाणाºया बसेस सरासरी १० ते ३० मिनिटांच्या अंतराने सुरु आहे. या फेºयांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन भंडाराच्या विभागीय वाहतूक अधिकाºयांनी केले आहे. मात्र वळसा घालून तिप्पट खर्चाने साकोलीमार्गे प्रवास करण्याचा हा लेखी सल्ला येथील प्रवाशांना मान्य नाही. उलट या सल्ल्याने प्रवाशी संतप्त आहेत. १७ जानेवारी २०१५ रोजी अर्जुनी-मोरगाव-यवतमाळ ही लांब पल्ल्याची बस सुरु करण्यात आली होती. ती सुद्धा काही कालावधीतच बंद करण्यात आली. म.रा. परिवहन महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे अर्जुनी-मोरगाव येथून सकाळी नागपूरला ४ ते ५ लक्झरी बसेस सुरु आहेत.