Boost at home-based touring tourism | होम स्टे देणार पर्यटनाला बुस्ट

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५० गावांची निवड : रोजगार मिळण्यास होणार मदत

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास प्रशासनाला महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन केंद्रालगत असलेल्या ५० गावात ‘होम स्टे’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. याकरिता काही गावांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, हाजरा फॉल, बोदलकसा, सुकडी डाकराम, कचारगड, प्रतापगड, नागराधाम, खरोबा पहाडी, मांडोदेवी यासारखी पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळे आहेत. नवेगावबांध राष्टÑीय उद्यान परिसरात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. गोंदिया जिल्ह्यात तलावांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हिवाळ्यात येथे विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे देश व विदेशातील पर्यटक देखील येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतात. बाहेरुन येणाºया पर्यटकांना ग्रामीण संस्कृती विषयी कुतुहल असते. यासर्व बाबींचा विचार करता पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्याची दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील ५० गावात ‘होम स्टे’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी निवड केलेल्या गावातील दोन कुटुबांना एक खोली आणि शौचालय बांधकामासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच या होम स्टे स्थळांची माहिती महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यास मदत होईल.बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना थांबण्याच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास मदत होईल.याकरिता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सारस संवर्धनासाठी २७ तलाव राखीव
गोंदिया जिल्ह्याची ओळख आता दुर्मिळ सारस पक्ष्यांचे संवर्धन करणारा जिल्हा म्हणून होवू लागली आहे. सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सारस संवर्धनासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे सारस पक्ष्यांची संख्या वाढविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. सारस पक्ष्यांचे वास्तव्य आढळणारे जिल्ह्यातील २७ तलाव राखीव ठेवले जाणार आहे. यात सारस पक्ष्यांचे खाद्य आणि या परिसरात सेंद्रीय शेती करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
दुर्मिळ प्रजातीच्या रोपांची नर्सरी
जिल्ह्यात वनसंपती मोठ्या प्रमाणात असून अनेक औषधोपयोगी वनस्पतींचा यात समावेश आहे. मात्र यांचे संवर्धन न केल्याने काही वनस्पती नष्ट होत आहे. यामुळे दुर्मिळ असलेल्या वनस्पती आणि झाडांच्या रोपांची नर्सरी लोहारा येथे तयार करण्यात येणार आहे.