तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:47 PM2019-05-15T21:47:35+5:302019-05-15T21:48:02+5:30

तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे.

The base reached by Mama Lake in Taluka | तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

Next
ठळक मुद्दे२० टक्के पाणी साठा : लघु पाटबंधारे तलावांची तीच स्थिती

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. काही तलावानी तर तळ गाठणे ही सुरु केले आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत या तलावात पाणी साठा शिल्लक राहणार की नाही हे सांगणे मात्र अवघड आहे.
विशेष म्हणजे यंदा तापमानात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तलावातील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होवून पाणी साठा झपाट्याने घट होत आहे.
तालुक्यात एकूण मामा तलावाची संख्या १६१ असून त्यांची एकंदरित पाणी साठवण क्षमता १४.३० दशलक्ष घनमिटर आहे. वर्तमान स्थितीत केवळ ३.५० दशलक्ष घन मिटर पाणी तलावात शिल्लक आहे.
तालुक्यात प्रत्येक गाव शेजारी एक किंवा दोन मामा तलाव असून शेकडो गावाची जीवन दायीनी म्हणून मामा तलावाचा उपयोग पडतो. परंतु अनेक मामा तलावात आता ठणठणाट होण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
मामा तलावातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याचे पाणी, जनावरे धुणे, कपडे धुणे यासह विविध बांधकाम आणि पिकांसाठी केला जातो. मात्र हे तलाव कोरडे पडल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असते.
पाझर तलावाची स्थिती चांगली
तालुक्यात एकूण चार पाझर तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ३९ हेक्टर आहे. तर पाणी साठवण क्षमता ०.३१ घनमिटर आहे. पाझर तलावातून मागील खरीप हंगामात २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले तरी वर्तमान स्थितीत ०.२० घन मिटर म्हणजे ६४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
डागडुजीच्या नावावर वारेमाप खर्च
लघु पाटबंधारे अंतर्गत तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यांची एकूण प्रकल्पीय साठा क्षमता ४.८८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या स्थितीत या तलावात केवळ १ घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावांची दुरूस्ती केली जात नसल्याने यात पाणी साचून राहण्याऐवजी सहज वाहून जात आहे. त्यामुळे तलावांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.सिंचन विभागाकडून दरवर्षी डागडुजीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले सांगितले जाते. मात्र यानंतरही तलावांची तीच स्थिती कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दीड हजार हेक्टर शेतीचे सिंचन
मागील खरीप हंगामात मामा तलाव आणि लघु पाटबंधारे (लपा) विभागाचे तलाव मिळून एकूण एक हजार ४२४ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. यामध्ये मामा तलावातून ११३० हेक्टरला लपा तलावातून २८.२ हेक्टरला आणि पाझर तलावातून २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. लपा तलावाची एकूण सिंचन क्षमता १६३०.५८ हेक्टर असून १७.३० टक्के पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. तर मामा तलावांची एकूण सिंचन क्षमता ३६३० हेक्टर असून ३१ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला.

Web Title: The base reached by Mama Lake in Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.