The ban on the formation of Bhima Koregaon is blocked | भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

ठळक मुद्देटायरची जाळपोळ : रॅली व मोर्चा काढून नोंदविला निषेध, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही उमटले पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद बुधवारी (दि.३) तिस-या दिवशीही गोंदिया शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमटले. शहरातील विविध संघटनातर्फे ठिकठिकाणी सभा घेऊन व रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील आठही तालुक्यात ेबंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथील सर्व शाळा, महाविद्यालये व व्यावसायीक प्रतिष्ठाणे पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या.बंद दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे गोंदिया शहराला पोलीस छावणीचे रुप आले होते.
विविध आंबेडकरी संघटनानी बुधवारी गोंदिया शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शहरातील सर्व प्रमुख चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध संघटनाचे पदाधिकारी, सदस्य आणि आंबेडकरी समाजबांधव सकाळी ८ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम, भाकपचे मिलिंद गणवीर, अमित भालेराव, एच.आर.लाडे, युवक काँग्रेसचे संदीप ठाकूर, राष्ट्रवादीचे मनोहर वालदे, ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे खेमेंद्र कटरे, माजी.न.प.उपाध्यक्ष पंकज यादव, रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे भाऊ गजभिये, समता संग्राम परिषदेचे सतीश बन्सोड, दिपेन वासनिक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे रतन वासनिक व काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, हंसू वासनिक, मधु बनसोड, अ‍ॅड. राजकुमार बोंम्बार्डे, डॉ. मिलींद राऊत, डी. एस. मेश्राम, अतुल सतदेवे,विलास राऊत, रामचंद पाटील, धनंजय वैद्य, भागवत मेश्राम, देवा रुसे, निलेश देशभ्रतार, यशपाल डोंगरे, वसंत गणवीर, शुध्दोदन शहारे, विनित शहारे, अशोक बेलेकर उपस्थित होते. उपस्थितांनी भीमा कोरेगाव येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच सरकार आणि पोलीस प्रशासनाने यात हयगय केल्याचा आरोप केला. अशा घटनामुळे समाजातील वातावरण बिघडत असून हे टाळण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बहुजन समाज पक्षाच्यावतीने शहरात रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बसप कार्यकर्त्यानी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. यावेळी विविध संघटनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देऊन या घटनेस जबाबदार असणाºयावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
टायरची जाळपोळ, रास्ता रोको
शहरातील नेहरु चौकात काही युवकांनी टायरची जाळपोळ करुन भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. तर गोरेगाव-ढिवरटोली मार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळापुरती ठप्प झाली होती.
रॅली काढून नोंदविला निषेध
बहुजन समाज पक्ष व विविध आंबेडकरी संघटनातर्फे शहरात मोटार सायकल रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीमध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश होता. भीमा कोरेगाव येथील घटनेबाबत नेते बोलत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
शाळा, महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाणे बंद
विविध आंबेडकरी संघटनानी बुधवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गोंदिया शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. तर शहरातील भाजीबाजार व व्यावसायीक प्रतिष्ठाणे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
जिल्ह्यातील ५०० बसफेऱ्या रद्द
बंदच्या पार्श्वभूमिवर गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या बसफेºया सकाळी ७.३० वाजतानंतर रद्द करण्यात आल्या होत्या. दिवसभरात गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या एकूण ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते.
शालेय विद्यार्थ्यांना फटका
बुधवारी शाळा व महाविद्यालय बंद असल्याची पूर्व सूचना विद्यार्थ्याना मिळाली नव्हती. त्यामुळे सकाळी ७ वाजता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी बसने गोंदियाला आले होते. मात्र येथे आल्यानंतर शाळा व महाविद्यालय बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर परत जाण्यासाठी बसस्थानक गाठले. मात्र बसफेºया बंद असल्याने या विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली होती.


Web Title: The ban on the formation of Bhima Koregaon is blocked
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.