जिल्ह्यात ग्रा.पं.साठी ८५.५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:11 PM2017-10-16T23:11:47+5:302017-10-16T23:12:51+5:30

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

85.58 percent polling for Gram Panchayat in district | जिल्ह्यात ग्रा.पं.साठी ८५.५८ टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रा.पं.साठी ८५.५८ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देवडेगाव येथील घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान : दुर्गम भागातही मतदारांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण ८५.५८ टक्के मतदान झाले. तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील खुनाची घटना वगळता इतर सर्वच केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून गावा गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान सोमवारी निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह पाहयला मिळाला. विशेष म्हणजे युवा मतदारांनी सुध्दा या निवडणुकीत पुढे येत मतदान केल्याचे चित्र जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर होते. नक्षलप्रभावीत आणि अतिदुर्गम भागात सुध्दा ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्साह असल्याचे चित्र होते. नक्षलप्रभावीत भागात सकाळी ८ वाजतापासूनच मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र होते.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले होते. सर्वच पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्राच्या परिसरात स्वत:च्या वाहनाने पोहचवित असल्याचे मतदान केंद्रावर पाहयला मिळाले.
ग्रामपंचायतची निवडणूक कुठल्याच राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांना बाहेरून पाठींबा देतात. ग्रामपंचायत निवडणुकीवरच पुढील निवडणुकांचे समीकरण अवलंबून असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पडद्याआड उमेदवारांना मदत करित असल्याचे चित्र काही गावात होते. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.
३४१ ग्रामपंचातींसाठी मतदान
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. तर तीन ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) रोजी ३४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली.
संवेदनशील केंद्रावर पोलिसांची नजर
निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली होती. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान
गोरेगाव व तिरोडा तालुक्यातील काही मतदान केंद्रावर दुपारी ४.३० वाजतानंतर मतदारांची गर्दी वाढली. त्यामुळे या केंद्रावर सायंकाळी ७ :१५ वाजेपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. याला निवडणूक विभागाने सुध्दा दुजोरा दिला.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायत निवडणूक राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. येथूनच पुढे जिल्हा परिषद सदस्यापासून आमदार, खासदारकीची निवडणूक लढविली जाते.याच निवडणुकीवर पुढील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागात आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहयला मिळते. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.
आमगाव खूर्दवासीयांचा बहिष्कार कायम
सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतयला नगर परिषदेचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीला घेवून आमगाव खुर्द येथील गावकºयांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या दिवसांपर्यंत शासन आणि प्रशासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने आमगाव खुर्द येथील गावकºयांनी सोमवारी (दि.१६) ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज
३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ८५.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मंगळवारी (दि.१७) रोजी सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मंगळवारी होणार आहे.
विजयासाठी उमेदवारांची धडपड
३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ८५.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चांगलीच चूरस पाहयला मिळाली. जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजुने व्हावे, यासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती. यासाठी उमेदवारांनी चारचाकी व दुचाकी वाहनाने वृध्द महिला व पुरूष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याची व्यवस्था करुन दिली होती.
मतदानात महिला अग्रेसर
जिल्ह्यात ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण ८५.५८ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानातही महिला अग्रेसर असल्याचे चित्र आहे.

Web Title: 85.58 percent polling for Gram Panchayat in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.