78 villages of Gondia district alert for the protection of sarus crane | सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी गोंदियात ‘सारस स्केप’ ची ७८ गावांत लोकचळवळ
सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी गोंदियात ‘सारस स्केप’ ची ७८ गावांत लोकचळवळ

ठळक मुद्दे१३ वर्षापासून स्वयंसेवकांची धडपडसारस पक्ष्यांच्या संख्येत होत आहे वाढ

नरेश रहिले।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील काही सुज्ञ तरूणांनी घेतली आहे. गोंदिया, बालाघाट व भंडारा या तीन जिल्ह्यांतील ‘सारस स्केप’ मधील ७८ गावात सारस बचावासाठी या तरूणांनी सेवा संस्था निर्माण केली. या संस्थेच्या माध्यामतून सदस्यांनी गावागावातील नागरिकांना सारस संवर्धनासाठी लोकचळवळ उभी केली आहे.
महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. १३ वर्षापूर्वी अत्यल्प असलेली सारसांची संख्या आता ३५ च्या घरात पोहचली आहे. गोंदिया, भंडारा व मध्यप्रदेशच्या बालाघाट या तिन जिल्ह्यात सारस संवर्धनाचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे गोंदिया, बालाघाट व भंडारा या तिन्ही जिल्ह्यातील सारस स्केप मधील संख्या आजघडीला ८० ते ८५ च्या दरम्यान आहे. या तिन जिल्ह्यात सारसांचे अधिवास असल्याने या गावांमधील लोकांना सारसाचे महत्व पटवून देण्याबरोबर त्यांचे संवर्धन कसे करावे हे सांगण्यासाठी सेवा संस्थेचे तरूण गावागावात वेळोवेळी पोहचत आहेत. मागील ५ वर्षापासून सेवा संस्थेच्या अविरत कार्यामुळे गावागावात सारस संवर्धनासाठी आता लोकांनी पुढाकार घेतला आहे. गोंदियाचे वैभव असलेल्या सारसांची संख्या वाढविणे किती महत्वाचे आहे ही बाब ओळखून आता सारस बचावासाठी लोकचळवळ उभी झाली आहे. प्रत्येक गावातील तरूण किंवा त्या गावातील पुढारी सारसच्या संवर्धनासाठी आपले योगदान देत आहे. ज्या शेतात सारसांची घरटी आहेत त्या घरटींवर संनियंत्रण या तरूणांबरोबर पक्षीप्रेमींची असते. याचेच फलीत सारसांचे नविन बच्चे तयार होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४० गावात, बालाघाट जिल्ह्यातील ३५ तर भंडारा जिल्ह्यातील ३ गावात हे तरूण सारस संवर्धनासाठी घराघरात पोहचले आहेत.

सारस संरक्षणासाठी ठोस उपाय नाही
सारस बचावासाठी सेवा संस्थेंकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांच्या कार्याला शासनाच्या कार्याची जोड मिळाल्यास सारस संवर्धन करण्यास जोमाने मदत होईल. ज्या सारसाने गोंदियाचे नाव देशाच्या पाठीवर नेऊन ठेवले त्या गोंदियाच्या वैभवाकडे शासन व प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष होत आहे. सारस संवर्धनासाठी पाहिजे त्या प्रमाणात अजूनही ठोस पावले उचलण्यात आली नाही. सारस संवर्धन प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. संस्थेने अनेक प्रस्ताव शासन दरबारी मांडले आहेत. आताचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सारस हे गोंदियाचे वैभव आहे असे ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी ते गांभीर्याने लक्ष घालत आहेत.

प्रेमासाठी त्यागाचे प्रतिक
भारतात सारस पक्ष्याचे जोडपे पाहून नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या सुखी जीवनाची सुरूवात करतात. जून महिन्यात सारसची जोडी एकत्र येते. जोडीने नृत्य करणे, उड्या घेणे व गवताच्या काड्या ऐकमेकावर फेकने, नर जातीचे सारस चोच वर करून पंख पसरविते तर मादा जातीचे सारस मान खाली करून प्रतिसाद देते. सारस प्रेमात त्याग ही करते. सारस पक्ष्याचे एकमेकावरील प्रेम त्यागाचे प्रतिक आहे. जोडीतील एक सारस मेल्यावर दुसराही सारस त्यागच्या भावनेतून आपले प्राण त्यागतो, असे आपल्या पुर्वजांचे म्हणणे होते.

जेव्हा सारस बचाव अभियानाची सुरूवात झाली. तेव्हा गावागावात किंवा शासन स्तरावर जनजागृती नव्हती. सारसांचे महत्व त्यावेळी कळत नव्हते आता ते कळू लागले आहे. शासनही याकडे लक्ष देत आहे.आम्हचे स्वयंसेवक न थकता मागील अनेक वर्षांपासून नियमीत कार्य करीत आहेत. हे कार्य पुढे सुरूच राहील.
-सावन बहेकार
महाराष्ट युथ आयकॉन २०१४ तथा
सँक्चुरी एशिया अवॉर्ड २०१६ पुरस्कार विजेते.


Web Title: 78 villages of Gondia district alert for the protection of sarus crane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.