678 classrooms of Z.P. schools are in jeopardy | झेडपी शाळांच्या ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : शिक्षण विभाग बिनधास्त

अंकुश गुंडावार ।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र गंभीर प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नाही.
काही दिवसांपूर्वी जीर्ण इमारत कोसळून अनेकांचा जीव गेल्याची घटना मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमातींचा मुद्दा सर्वत्र पुन्हा एका चर्चेत आला. मात्र यापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कसालाही बोध घेतला नाही.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०६९ शाळा असून यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे १ लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे डिजीटलपासून ते सेमी इंग्रजीचे वर्ग आणि कॉन्हवेंट सुरू केले जात आहे. तसेच खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. मात्र शाळांमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १०६९ शाळांच्या इमारतींपैकी बहुतेक इमारती जीर्णावस्थेत आहेत. जि.प.बांधकाम विभागातर्फे दरवर्षी केवळ या इमारतींची डागडूजी करुन या इमारती योग्य असल्याचे दाखविले जाते. मात्र या सर्व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण ३८१७ वर्गखोल्यांपैकी केवळ २५०८ वर्गखोल्या चांगल्या स्थितीत तर तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत असून त्या केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अहवाल जि.प.बांधकाम विभागाने दिला आहे. मात्र यानंतरही शिक्षण विभागासह प्रशासनाला त्यांचे गांर्भिय पटलेले नाही. विशेष म्हणजे या जीर्ण वर्गखोल्यांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना अद्यापनाचे कार्य सुरूच असल्याची माहिती आहे. या वर्गखोल्यांची स्थिती पाहता त्या त्वरीत पाडून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे असल्याचा अहवाल सर्व शिक्षा अभियानाच्या बांधकाम विभागाने जि.प.शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. यावर शिक्षण विभागाने कुठलीच उपाय योजना सुरू केल्या नसल्याची माहिती आहे.

अनेक शाळांचे बांधकाम ३५ वर्षांपूर्वीचे
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतीचे बांधकाम ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे काही जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे अपेक्षीत आहे. मात्र जि.प. प्रशासनासह शिक्षण विभागाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे.
बांधकामासाठी हवा १० कोटी रुपयांचा निधी
जिल्ह्यातील जि.प.शाळा इमारतींची दुरूस्ती आणि नवीन वर्गखोल्या बांधकामाकरिता १० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र ऐवढा निधी उपलब्ध होत नसल्याने वर्गखोलींचे बांधकाम रखडल्याची माहिती या विभागाच्या अधिकाºयांनी दिली.