गोव्यात वाढत्या अपघात बळींबाबत चिंता, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 10:04 AM2018-04-25T10:04:57+5:302018-04-25T10:04:57+5:30

गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला.

Worrying about the Accidental Deaths in Goa, Start of Road Safety Week Campaign | गोव्यात वाढत्या अपघात बळींबाबत चिंता, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

गोव्यात वाढत्या अपघात बळींबाबत चिंता, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

Next

पणजी : गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला. रस्ता सुरक्षेसाठी सरकार बरेच काही करत असताना व बरीच जागृतीही विविध आघाड्यांवर होत असताना देखील वाहनांचे अपघात होत आहेत व त्यात बळीही जात आहेत याविषयी खेद वाटतो, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे रस्ता सुरक्षा सप्ताहावेळी बोलताना सांगितले. मंत्री ढवळीकर हेच सार्वजनिक बांधकाम खात्याचेही मंत्री आहेत. ढवळीकर यांच्या हस्ते बांबोळी येथी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री तथा पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे, सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, वाहतूक संचालक निखिल देसाई, डीजीपी मुक्तेश चंदर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे (गोमेकॉ) डीन डॉ. प्रदीप नाईक व्यासपीठावर होते.

वाहने चालविणा-यांनी वाहतूक नियमांचे पालन हे स्वत:च्या मनापासून करावे, कुणी तरी पालन करायला सांगतो म्हणून नव्हे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. लोकांनी रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सरकार रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरूच ठेवील, असेही ढवळीकर यांनी नमूद केले. रायबंदर-जुनेगोवे बायपासवर आम्ही दुचाकी चालकांसाठी स्वतंत्र लेन बांधली. त्यामुळे वाहन अपघातांचे प्रमाण 20 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यत खाली आले. अजूनही काही वाहन चालक या लेनच्या बाहेर येऊन दुचाकी हाकतात, असे ढवळीकर म्हणाले.

वाहन चालविण्याचा परवाना कुणालाही देताना कठोरपणे नियमांचे व प्रक्रियेचे पालन करायला हवे. मानवी जीवन मौल्यवान असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची सवय व्हायला हवी, असे प्रतापसिंग राणे म्हणाले. मुलांनी कितीही हट्ट धरला तरी, पालकांनी स्वत:च्या अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये, असे आवाहन आमदार सिल्वेरा यांनी केले.

युवा वर्गामध्ये रस्ता सुरक्षेविषयी गांभीर्य नाही. गोमेकॉ इस्पितळाचे डॉक्टर्स अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करतातच पण अनेकदा अपघातातील व्यक्तींना होणा-या जखमा या खूप गंभीर असतात, असे डीन डॉ. नाईक यांनी नमूद केले. अपघात रोखता येतात, असे ते म्हणाले.

हायस्कूलमध्ये शिकत असतानाच्या काळापासून मुलांनी रस्ता सुरक्षेविषयी जागृत असावे. रस्ता सुरक्षेची सवय विद्यार्थी जीवनापासूनच मुलांनी स्वत:ला लावून घ्यावी. शालेय अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहेच, तेवढेच मुलांना रस्ता सुरक्षेविषयीही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे, असे मुक्तेश चंदर यांनी नमूद केले. डॉ. दयानंद राव यांनी सुत्रनिवेदन केले तर वाहतूक अधिकारी संदीप देसाई यांनी आभार मानले. दरम्यान, 83 व्यक्तींचा गेल्या जानेवारी ते 20 एप्रिलर्पयत गोव्यातील रस्त्यांवर वाहन अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. वार्षिक सरासरी तीनशे व्यक्तींचे बळी वाहन अपघातात जात आहेत.

Web Title: Worrying about the Accidental Deaths in Goa, Start of Road Safety Week Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.