पणजीतील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:41 PM2018-06-20T12:41:15+5:302018-06-20T12:41:15+5:30

गोवा पर्यटन विकास महामंडळाने तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करुन येथील सांतामोनिका जेटीसमोर बांधलेला मल्टिलेव्हल कार पार्किंग इमारत प्रकल्प तेथे पांढरा हत्ती ठरला आहे.

White elephant set to become a multi-purpose parking project in Panaji | पणजीतील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

पणजीतील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

Next

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळाने तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करुन येथील सांतामोनिका जेटीसमोर बांधलेला मल्टिलेव्हल कार पार्किंग इमारत प्रकल्प तेथे पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पावर महिना ३.५ लाख रुपये खर्च महामंडळाला येतो परंतु उत्पन्न शून्यच आहे. कारण अजून शुल्क आकारणी सुरु झालेली नाही. 

प्राप्त माहितीनुसार हा प्रकल्प पर्यटन महामंडळासाठी डोईजड ठरल्यानंतर महामंडळाने हात वर केले असून तो चालविणे आपल्याला शक्य होणार नसल्याचे सरकारला कळविले आहे. हा प्रकल्प चालू ठेवल्यास वर्षाकाठी साडेचार कोटी रुपये नुकसान सोसावे लागेल, असे महामंडळाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. हा पार्किंग प्रकल्प फसण्याचे मुख्य कारण म्हणजे या प्रकल्पासाठी चुकीची जागा निवडण्यात आली. सांतामोनिका जेटीवर जलविहार घडवून आणणा-या बोटींवर येणारे पर्यटक तसेच राजधानी शहरात फिरण्यासाठी येणारे पाहुणे या पार्किंग इमारतीचा वापर करतील, अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली. या इमारतीत वाहने पार्किंगसाठी येतच नाहीत नाहीत त्यामुळे इमारत ओस पडलेली असते. या ठिकाणी वीज, पाणी यावर मोठा खर्च होत आहे तोही भरुन निघत नाही. 

राज्यातील या पहिल्यावहिल्या मल्टिपार्किंग इमारतीत ५५0 कारगाड्या ठेवण्याची व्यवस्था आहे. तब्बल अडीच वर्षे या इमारतीचे काम चालले. एकूण १३,५५६ चौरस पार्किंग क्षेत्र येथे उपलब्ध झाले आहे. मोठ्या बसेस ठेवण्याची व्यवस्था मात्र येथे नाही. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून पर्यटक मोठ्या बसगाड्या घेऊन येण्याचे प्रमाण जास्त आहे. हे पर्यटक नंतर एखाद्या खुल्या जागेत मोठ्या बसगाड्या ठेवतात. त्यामुळे बसगाड्या घेऊन येणा-या पाहुण्यांना या पार्किंग प्रकल्पाचा तसा विशेष फायदा होत नाही.  सध्या मोफत वाहने पार्क करण्याची सोय असतानाही येथे कोणी फिरकत नाही तर कालांतराने शुल्क लागू झाल्यानंतर कोण बरे येईल, असा सवाल उपस्थित होत आहे. 

पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पार्किंग शुल्क आकारण्याचे काम आउटसोर्स करण्यासाठी गेल्या कार्यकाळात निविदा काढल्या होत्या परंतु वित्त खात्याने प्रश्न उपस्थित केल्याने निविदा रखडल्या आता नव्याने निविदा काढणार आहोत. सध्या वाहनांना शुल्क आकारले जात नाही. महामंडळाने कारगाड्यांसाठी चार तासांकरित २0 रुपये, मिनी बसेससाठी ८0 रुपये असे शुल्क निश्चित केलेले आहे. 

सध्या मोफत सोय असूनही कोणी येत नाही. कालांतराने शुल्क लागू झाल्यानंतर कोणी फिरकेल का, असा प्रश्न काब्राल यांना केला असता आमचा भर पार्किंग शुल्कावर नाही तर तेथे जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळविण्यासवर असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

Web Title: White elephant set to become a multi-purpose parking project in Panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.