तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:17 PM2019-05-09T19:17:22+5:302019-05-09T19:19:52+5:30

वाहतूक पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम : धूळ, धुराचे प्रदूषण सोसत आरोग्याची होते आबाळ

Walking in the heat of the hot sunshine ... | तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो...

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो...

Next

वासुदेव पागी/पणजी : ‘तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो... मी बीज सावलीचे पेरीत चाललो...’ अशीच काहीशी अवस्था गोव्याच्या वाहतूक पोलिसांची उन्हाळ्यात झालेली दिसते. रखरखते ऊन असो किंवा मुसळधार पाऊस, परिस्थितीची वा परिणामांची तमा न बाळगता त्यांना कर्तव्यनिष्ठेशी ठाम राहावे लागते. ग्रीष्माचा दाह सोसून शरीरे भाजल्यागत काळी कुळकुळीत होतात, धूळ व धुराचे प्रदूषण सोसून आरोग्याची आबाळ होते, अशा वाहतूक विभागात कुणीही स्वखुशीने येत नसतो; परंतु कर्तव्यभावनेमुळे ते याही परिस्थितीचा सामना करतात.
उन्हात त्वचा रापल्यामुळे काळे पडणारे अंग व व पांढराशुभ्र गणवेश यामुळे  वाहतूक पोलिसांची थट्टा केली जाते. त्यांना नावे ठेवणे सोपे असते; परंतु त्यांची तशी स्थिती का होते, हे समजून घेतले, तर त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याची कल्पना येते. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाची राज्यात १२ पोलीस स्थानके आहेत. एकूण ५५० पोलीस कर्मचारी आहेत. ज्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर राहून काम करावे लागते, असे कॉन्स्टेबलपासून उपनिरीक्षकापर्यंतचे ५०० कर्मचारी आहेत. अशा १० कर्मचा-यांशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता, त्यांनी व्यथा कथन केल्या.
१२ तास ड्युटी करणे अडचणीचे नाही; परंतु ही ड्युटी प्रत्येक दिवशी रस्त्यावर रणरणत्या उन्हात करावी लागते, तेव्हा यातना होतात. घामाच्या धारांनी कपडेही भिजून जातात. त्यातही मधुमेह व रक्तदाबाची समस्या असलेले अनेक पोलीस असल्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. उन्हात चक्कर येऊन कोसळण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. आज उन्हात राहिलेला पोलीस पुन्हा दुस-या दिवशी उन्हात ड्युटी न करता इतर ठिकाणी ड्युटी करू शकेल, अशी व्यवस्था केली तर त्यांच्या यातना कमी होऊ शकतात. 
शिवाय उन्हाळ्यात लांब हातमोजे, मास्क यांसारखे साहित्य त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हातमोजे केवळ व्हीआयपींचा प्रवास असतानाच वापरले जात आहेत. वारंवार ठप्प होणारी वाहतूक ही पोलिसांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ असते. त्यावेळी त्यांना फारच धावपळ करावी लागते. 
 
कमी सिग्नल, अधिक ताण
क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना सर्वाधिक वेळ द्यावा लागतो. चार किंवा अधिक रस्त्यांच्या ठिकाणी पोलिसांना वाहनांना रस्ता पार करण्यासाठी सतत हालचाली करून निर्देश द्यावे लागतात. ज्या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल्स कार्यान्वित आहेत, अशा ठिकाणी वाहतूक कर्मचा-याला फारसे सायास पडत नाहीत. त्यामुळे तो केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवून निर्धास्त राहू शकतो. पणजीसारख्या शहरातही दिवजा सर्कल, सांतइनेज व इतर अनेक जंक्शन्सवर सिग्नल लावलेले नाहीत. 

पोलिसांना नावे ठेवणे सोपे असते; परंतु तासन्तास उन्हात राहून पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करतात. एक दिवस वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले नाहीत, तर वाहतुकीची काय दशा होईल, याचा विचार केल्यास त्यांचे महत्त्व जाणवेल. पोलिसांच्या सेवेत दर्जात्मक सुधारणा होताना दिसत आहेत.
- धर्मेश आंगले, 
उपअधीक्षक, वाहतूक विभाग

आमचे पोलीस कठीण परिस्थितीतही सेवा बजावत आहेत. ते उन्हापावसाची तमा बाळगत नाहीत. त्यांच्या कार्याची आम्हाला जाणीव आहे व अभिमानही आहे.
- ब्रॅँडन डिसोझा, 
निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Walking in the heat of the hot sunshine ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.