गोव्यात उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब, वाड्यांवर निवडणूक शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 07:57 PM2018-01-02T19:57:30+5:302018-01-02T19:57:46+5:30

निवडणूक आयोगाने गोव्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लवकरच विद्यार्थ्यांना एकत्र करून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Voter literacy clubs in high schools, Goa election school in Goa | गोव्यात उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब, वाड्यांवर निवडणूक शाळा

गोव्यात उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब, वाड्यांवर निवडणूक शाळा

Next

पणजी : निवडणूक आयोगाने गोव्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लवकरच विद्यार्थ्यांना एकत्र करून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वाड्यांवर जिथे महिला तसेच पुरुष एकत्र जमतात त्याठिकाणी निवडणूक शाळा  आयोजित करून नैतिक मतदानाविषयी जागृती करावी असे ठरविले आहे.

दिल्लीहून केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील मुख्य निवडणूक अधिका-यांच्या आल्तिनो येथील कार्यालयाला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती व इतर अधिका-यांनी मिळून राज्यातील विद्यार्थी वर्गासाठी मतदार साक्षरता क्लब कसे सुरू करावेत याची आखणी केली आहे. आठवी-नववीच्या विद्यार्थ्यापासून बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांपासून मतदार साक्षरता क्लबमध्ये सहभागी होता येणार आहे. पंचायत स्तरावर जाऊन काम करणा-या बीएलओंसह अन्य अधिका-यांच्या सहभागाने ही योजना राबविली जाणार आहे. हायस्कुल व हायरसेकंडरींमध्ये कधीच अशा प्रकारचे क्लब अस्तित्वात आलेले नाहीत. ते आता येणार आहेत.

जिल्हास्तरीय क्लबच्या चेअरमन म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. राज्यस्तरीय क्लबचे अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी काम पाहणार आहेत. विद्यार्थांमध्ये मतदानाविषयी आणि निवडणुकांविषयी जागृती आणणो असा मतदार साक्षरता क्लबच्या स्थापनेमागील हेतू आहे. विद्यार्थ्यांना जरी वयाची अठरा वर्षे झाल्याशिवाय मतदानाचा हक्क मिळत नसला तरी, विद्यार्थांनी  मतदान प्रक्रियेविषयी जागृत असावे म्हणून मतदार साक्षरता क्लबमार्फंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मतदान का करायचे असते, निवडणुका का घेतल्या जातात, कधी घेतल्या जातात, मतदानाचा हक्क मिळण्याचे वय होत आल्यानंतर मतदार यादीत नाव कसे समाविष्ट करायचे याविषयी विद्यार्थ्यांना क्लबद्वारे साक्षर केले जाणार आहे.

अनेक ठिकाणी महिला व पुरुष गप्पा गोष्टी करण्यासाठी जमत असतात. अशाठिकाणी निवडणूक शाळा आयोजित करण्याची संकल्पना गोव्यात आता प्रथमच अंमलात आणली जाणार आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावे तसेच दबावाखाली न येता मतदान करावे म्हणून मतदारांना जागृत केले जाणार आहे. मतदानाचे प्रमाण अधिकाधिक वाढावे हाही त्यामागील हेतू आहे. मतदार यादीतून कुणाचेच नाव अकारण बाहेर उरू नये या हेतूनेही चुनाव पाठशालेत जागृती केली जाणार आहे.

Web Title: Voter literacy clubs in high schools, Goa election school in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.