गोमंतकीयांची पाँडिचेरीत वाहनखरेदी, करचुकवेगीरीविरुध्द आरटीओ उघडणार कडक मोहीम

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 2:37pm

गोवा सरकारने आता या करात प्रचंड वाढ केली आहे.

पणजी- एक काळ असा होता की, वाहनांची नोंदणी कमी खर्चात होते म्हणून शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकातील लोक गोव्यात येऊन वाहन खरेदी करीत असत. तेव्हा महाराष्ट्रात १२ टक्के तर येथे केवळ ४ टक्के नोंदणी कर होता. गोवा सरकारने आता या करात प्रचंड वाढ केली आहे. आरामदायी मोटारींवरील कर तब्बल २१ टक्क्यांवर नेल्याने गोव्यातील लोक आता पाँडिचरीत वाहने खरेदी करु लागले आहेत. यामुळे येथील वाहतूक खात्याचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने पाँडिचरीत वाहन नोंदणी करणाऱ्यांविरुध्द मोहीम उघण्याचा निर्णय येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

वाहतूक संचालक निखिल देसाई म्हणाले की, वाहन नोंदणीचा लाखो रुपये खर्च वाचविण्यासाठी गोंमतकीय पाँडिचेरीत मोटारी खरेदी करीत आहेत कारण तेथे हा कर अत्यंत कमी आहे. अन्य राज्यातून खरेदी करुन गोव्यात आणल्या जाणाऱ्या आलिशान मोटारींवर विमानतळ, पब, पंचतारांकित हॉटेल्स आदी ठिकाणी पाळत ठेवली जाणार आहे. खास करुन पाँडिचरीच्या ‘पीवाय’ रजिस्ट्रेशनच्या मोटारी आढळून आल्यास खात्याचे अधिकारी त्याची दखल घेतील आणि पुढील कारवाई करतील.

पाँडिचेरीत नोंदणी शुल्क अत्यंत कमी आहे त्यामुळे तेथे नोंदणी केली जाते. अशा आलिशान मोटारी शनिवार, रविवार विकेण्डला किंवा सुट्टीच्या दिवशीच बाहेर काढल्या जातात. तशी  युक्ती वाहनमालक लढवतात. आलिशान व महागड्या मोटारींना गोव्यात २१ टक्के कर लावला जातो. परंतु पाँडिचेरीसारख्या राज्यात तो १ टक्क्यापेक्षा कमी आहे. ६0 लाख रुपये किमतीच्या मोटारीसशाठी येथे आयुष्यभराचा रस्ता कर ९ लाख ६0 हजार रुपये आहे. तर पाँडिचरीत तो केवळ १ लाख रुपये आहे.

आरटीओच्या एका अीधकाऱ्याने असे मत व्यक्त केले की, लोकांच्या सहकार्याशिवाय कारवाईची अंमलबजावणी अशक्य आहे. महागडी वाहने जप्त करुन आणली तर ती योग्यरित्या सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मूळ कराच्या २५ टक्के जास्त दंड म्हणून आकारण्याचे अधिकार खात्याला आहेत. अंमलबजावणी विभाग त्यासाठी सतर्क झाला आहे. कर चुकवेगिरी शोधणे हे तसे सोपे काम नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार देशभरात कुठेही वाहन नोंदणी करता येते. मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ एकाच राज्यात वाहनाचा वापर करणार असल्यास त्याची नोंदणी त्याच राज्यात करावी, असा नियम आहे. परंतु या नियमाला कर चुकवेगिरी करणारे हरताळ फासतात. नोंदणी बदलायची असल्यास मूळ जेथे नोंदणी झाली आहे, त्या संघप्रदेशाकडून किंवा राज्याकडून ना हरकत दाखला आणावा लागतो. पाँडिचरीत वाहन नोंदणी साठी तेथील कायम वास्तव्याचा पत्ता देण्याची गरज भासत नाही. गोव्यात मात्र कायम निवास असलेल्या पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो. वाहनवेड्या गोवेकरांना विलायती गाड्यांचा सोस आहे हे सर्वज्ञात आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या आलिशान ‘लॅम्बोर्गिनी’, सुमारे पाऊण कोटीच्या घरात किंमत असलेली बीएमडब्ल्यू, फेर्रारी, मार्सेती, लॅनोव्हर आदी विदेशी मोटारीही येथे दिसतात.  

संबंधित

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली
मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती चिंताजनक
मनोहर पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज, दुपारी एअर अ‍ॅम्बुलन्सने गोव्यात आणणार 
लवकरच साजरा होणार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन - श्रीपाद नाईक
गोवा राजभवनविरुद्धच्या तक्रारीवर मुख्य माहिती आयुक्तांचा उद्या निवाडा

गोवा कडून आणखी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली
मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती चिंताजनक
मनोहर पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज, दुपारी एअर अ‍ॅम्बुलन्सने गोव्यात आणणार 
लवकरच साजरा होणार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन - श्रीपाद नाईक
गोवा राजभवनविरुद्धच्या तक्रारीवर मुख्य माहिती आयुक्तांचा उद्या निवाडा

आणखी वाचा