Turbine failure in Sanjeevani sugar factory in Goa | गोव्यात संजीवनी साखर कारखान्यात गळीत हंगामाच्या प्रारंभीच टर्बाइनमध्ये बिघाड, राज्यातील ऊस उत्पादकांना फटका

पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाडामुळे काही दिवस गाळप बंद राहिल्याने त्याचा फटका ऊस राज्यातील ऊस उत्पादकांनाही बसला.
१४ नोव्हेंबर रोजी या कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला. तेव्हा कारखान्यातील तांत्रिकी दुरुस्तीचे काम बाकी होते परंतु घिसाडघाईने गळीत हंगाम सुरु करण्यात आल्याचा आरोप केला जातो. मात्र कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावताना तांत्रिकी समस्या आता दूर झालेली असल्याचा व पूर्ण वेगाने कारखाना सुरु असल्याचा दावा केला.

अकार्यक्षमतेचा ठपका मुख्य अभियंता आर. माने यांना काही काळापूर्वी निलंबित केले होते. त्यामुळे तेही कारखान्यात नाहीत. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाड दूर करण्यासाठी अलाहाबाद येथील त्रिवेणी टर्बाईन कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. कारखान्याचे मुख्य युनिट ४५ वर्षे जुने आहे. दरवर्षी त्याची दुरुस्ती करावी लागते. २0१२ १३ मध्ये दुरुस्तीवर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कोणताही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी गोव्यात तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे शेजारी महाराष्ट्र किंवा कर्नाटकात धाव घ्यावी लागते. गेल्या मोसमात २७ नोव्हेंबर २0१६ ते ३१ जानेवारी २0१७ असे ६६ दिवस गळीत हंगाम चालला. या काळात ४0,२३४ मेट्रिक टन ऊस स्थानिक शेतक-यांकडून या कारखान्याला मिळाला.

या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात केला जाणार आहे. दुसरीकडे कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे.

ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की,त्यांनी ऊस कापणीसाठी शेजारच्या राज्यातून ३२ मजूर आणले होते. परंतु कारखाना सुरुच होऊ न शकल्याने कापणी होऊ शकली नाही. हा ऊस वाया जाण्याची भीती आहे. ऊस एवढ्यात कापू नका, असा सल्ला कारख्यान्याचे अधिकारीच देऊ लागले आहेत. या व्यतिरिक्त ऊस कापणी व वाहतुकीसाठी औरंगाबादच्या कंपनीला कारखान्याने ५ कोटी रुपये दिले आहेत.

दरम्यान, घाईघाईत गळीत हंगाम सुरु करण्याची कार गरज होती असा सवाल सावर्डचे आमदार दीपक पावस्कर यांनी केला आहे. कारखाना पूर्ण वेगाने कार्यरत न राहिल्यास ऊस उत्पादन वाया जाईल, अशी भीती शेतकºयांना आहे.