पणजी
सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वाखालील रा. स्व. संघाचा एक संपूर्ण घटक वेगळा होऊन
प्रखर विरोधक म्हणून उभा ठाकल्याने
या वेळी पहिल्यांदाच भाजप उमेदवारांना संघटित बळाशिवाय स्वबळावर काम
करावे लागणार आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंच व गोवा सुरक्षा मंच यांनी बहुसंख्य मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पाडल्यामुळे भाजप संघटनेत अस्वस्थता आणि धाकधूक निर्माण झाली आहे. खात्रीशीर उमेदवारही धोक्याच्या रेषेबाहेर गेले आहेत.
‘‘संघाने फारकत घेतल्यामुळे भाजप संघटनेत जीव ओतून काम करणारा घटक राहिला नाही. त्यात वेलिंगकरांसारखी शक्ती विरोधात गेली व तिने पर्रीकरांना टीकेचे लक्ष्य बनविले हा कार्यकर्त्यांच्या मनावर एक मोठा आघात आहे,’’ अशी प्रतिक्रिया संघ आणि भाजप संघटनेत काम केलेल्या एका जबाबदार कार्यकर्त्याने व्यक्त केली. संघ जरी भाजपमध्ये प्रत्यक्षरीत्या काम करीत नसला तरी निवडणुकीच्या काळात या दोन्ही संघटना मिळून मिसळून कार्य करीत. भाजपच्या प्रत्येक निवडणूक समितीत महत्त्वपूर्ण जबाबदारी संघाच्या कार्यकर्त्याकडे असे. या निवडणुकीत ती उणीव जबरदस्तरीत्या जाणवणार आहे, असे हा कार्यकर्ता म्हणाला. याचा अर्थ भाजपकडे स्वत:ची संघटना नाही असे नाही; परंतु हे बहुसंख्य कार्यकर्ते एक तर उमेदवाराचे किंवा नेत्यांचे निष्ठावान आहेत. त्यांच्यात तळमळीचा अभाव असतो.
भाजपने संघाच्याच सहकार्याने गेल्या ३० वर्षांत पक्षसंघटना बांधली. ही संघटना संघाच्याच धर्तीवर उभारली गेलीय. त्यात नेत्याचे आदेश मानण्याची प्रथा आहे. सतीश धोंड गोव्यात असेतोवर त्यांनी ती अत्यंत बांधेसूद राहील याची खबरदारी घेतली. २०१२च्या निवडणुकीनंतर तिला तडे जाऊ लागले व पर्रीकर दिल्लीला गेल्यानंतर ती आणखी विस्कळीत बनली. पर्रीकर आणि धोंड ही जोडगोळी संघटनेत आणि सरकारात समन्वय आणि शिस्त निर्माण करण्यावर भर देत असे. शिवाय धोंड गोव्यात असेतोवर मंत्रिमंडळ संघटनेला डोईजड होणार नाही हे कटाक्षाने पाहात असत. परंतु वेलिंगकरांचा सवतासुभा आणि मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडून पक्षसंघटना बळकट बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचा अभाव, शिवाय शेवटच्या कार्यकर्त्याकडे जाण्याची दत्ता खोलकर आदींची असमर्थता यामुळे वेलिंगकरांचा प्रभाव वाढत गेला, त्या तुलनेने भाजप संघटनेचे बळ वाढू शकले नाही. सतीश धोंड यांच्यानंतर संघटना तल्लख बनविणारा दुसरा सक्षम संघटक पक्षाला मिळू शकला नाही, हे सुद्धा वास्तव आहे.
सूत्रांनी सांगितले, की तिकिटे प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन, काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या ओंगळवाण्या प्रतिक्रिया व शिवीगाळ, भाजपमधील बंडखोरी व मगोपच्या कळपात सामील होण्याचे प्रकार हे संघटना ढेपाळल्याचे लक्षण मानले जाते. यापूर्वी काँग्रेसमध्ये असे प्रकार चालत; कारण त्या पक्षात संघटना नावाला अस्तित्वात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, कोणताही पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा वेगवेगळे हितसंबंध जोपासणारे घटक पक्षात येतात. ते काम करतात आणि त्यानंतर आपल्या महत्त्वाकांक्षा व्यक्त करताना लाजत नाहीत. पर्रीकरांनीही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देताना पक्ष मोठा बनविण्यासाठी ही आयात महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे; परंतु याच नेत्यांना दिगंबर कामत भाजपमधून फुटले तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला होता व ते शल्य पर्रीकर अजून बाळगून असतात. त्याच धक्क्याचा सामना करताना पक्षाने यापुढे उमेदवाऱ्या मूळ भाजपवाल्यांनाच देण्याचे तत्त्व निश्चित केले होते. दुर्दैवाने १० वर्षांतच तत्त्वाला मुरड घालावी लागली असून सत्ता हेच ध्येय मानलेल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीला संघातून कडवा विरोध झाला व त्यातून संघटना विस्कळीत होण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. परंतु निरीक्षक असेही मानतात की भाजपचे केडर आता तयार झाले आहे आणि कितीही मोठे संकट येवो, ते भाजपबरोबरच राहाणार आहे.