Three-year-old girl abduction case, suspected Rizwan, will be sent to judicial custody | तीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी
तीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मडगाव: वर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आज या संशयिताला मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, त्या बालिकेच्या पालकांचा शोध लागला असला तरी ते पालक त्या मुलीच्या संगोपनासाठी तेवढे सक्षम नसल्याने अजूनही त्या बालिकेचा ताबा पालकांकडे देण्यात आलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे कोकण रेल्वे पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे पत्रव्यवहार केला असून, त्यात भोपाळहून त्या बालिकेला गोव्यात आणले तर तिचे पालनपोषणची जबाबदारी समिती पेलू शकणार का याबाबत विचारणा केली आहे.
मागच्या 9 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील मंगळुरु येथे रिझवान कालू इंदू याला तेथील पोलिसांनी अटक केली होती. मागाहून कोकण रेल्वे पोलिसांनी मंगळुरू येथे जाउन संशयिताला ताब्यात घेऊन नंतर रितसर अटकही केली होती. 25 सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्या बालिकेच्या पालकांचाही शोध लावण्यास यश मिळविले होते. 1 नोव्हेंबर 2017 रोजी मध्यरात्री मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून त्या तीन वर्षीय बालिकेचे अज्ञाताने अपहरण केले होते.

ती बालिका आपल्या पालकांसमवेत प्लॅटफॉर्मवर झोपली असता, तिचे अपहरण करण्यात आले होते. मूळ हुबळी येथील हे कुटुंब मडगावात कामानिमित्त आले होते. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात त्या मुलीचे अपहरण करतानाचं चित्र कैद झालं होतं. पहाटे आपली मुलगी दिसेनासी झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला होता. मागाहून या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंविच्या 363 व गोवा बाल कायदा कलम 8 अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-यावरील फुटेजच्या आधारे त्या बालिकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईलाही पथक रवाना करण्यात आले होते. मुंबईतल्या श्रीछत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर अपहरणकर्ता रेल्वे स्थानकावरून बाहेर जाताना तेथील सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये टिपला गेला होता. मुंबईला गेलेल्या पोलिसांना संशयित मात्र सापडू शकला नव्हता. त्यानंतरही अनेकदा पोलीस पथक मुंबई तसेच शेजारच्या राज्यात पाठवून देण्यात आले होते.


Web Title: Three-year-old girl abduction case, suspected Rizwan, will be sent to judicial custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.