या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:35 PM2018-12-14T13:35:03+5:302018-12-14T13:35:39+5:30

राजकीय, सामाजिक तसेच पर्यटनासाठी गोव्यात महत्त्वाचा असलेला तसेच गोव्यातील मोठ्या तालुक्यात गणना होणाऱ्या बार्देस तालुक्यात एकूण ४६३१ घरे शौचालयाविना आहेत.

In this tehsil, 4631 houses without toilet | या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना

या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना

googlenewsNext

म्हापसा : राजकीय, सामाजिक तसेच पर्यटनासाठी गोव्यात महत्त्वाचा असलेला तसेच गोव्यातील मोठ्या तालुक्यात गणना होणाऱ्या बार्देस तालुक्यात एकूण ४६३१ घरे शौचालयाविना आहेत. शौचालये नसल्याने या भागातील लोक उघड्यावर शाौचास जाण्यास प्राधान्य देत असतात. तसेच या तालुक्यासाठी किमान ६०३ सार्वजनिक शौचालयांची गरज असल्याचे या संबंधी तयार करण्यात आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोव्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बार्देस तालुक्यातील शौचालयांची स्थिती दयनीय असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.

शौचालये उपलब्ध नसण्यामागे विविध कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारणे म्हणजे काही घरे नदीच्या तिरावर असल्याने तसेच काही घरे वादात अडकल्याने शौचालयांची सोय करणे शक्य नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील शौचालयांची स्थिती मात्र चांगली आहे. तालुक्यात एकूण ३३ पंचायतींचा समावेश होत असून त्यात कळंगुट, कांदोळी, हणजूण सारख्या किनारी भागातील पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या पंचायतींचा समावेश होतो. या अहवालासाठी तालुक्यातील एकूण ४५,६९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ३७,०७२ घरांना शौचालयाची सोय असून ४६३१ घरे शौचालाविना आहेत.

तर ६०३ सार्वजनिक शौचालयांची गरज या तालुक्याला आहे. उत्तर गोव्यातील महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक असलेल्या थिवी पंचायत क्षेत्रात सर्वाधीक ३७१ शौचालयांची गरज असून त्यानंतर कामुर्ली या पंचायत क्षेत्रात २८५, गिरीत २५६, तसेच हळदोणा पंचायतीसाठी २५४ शौचालयांची व हणजूण-कायसूव पंचायतीसाठी १८८ शौचालयांची गरज आहे.

किनारी भागातील हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रासाठी ३११ सार्वजनिक शौचालये बांधण्यात यावेत असेही अहवालात म्हटले आहे. त्या बरोबर पर्वरी भागातील पेन्ह द फ्रान्स पंचायतीसाठी १२६, शिवोली-सडये पंचायतीसाठी ३७, सार्वजनिक शौचालये लोकांच्या सोयीसाठी बांधण्यात यावीत असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. या तालुक्यातील बरीचशी गावे मांडवी नदीच्या तिरावर असल्याने त्यातील बरीचशी घरे किना-यावर बांधण्यात आली आहेत. अशा घरांना शौचालये बांधणे शक्य नसल्याचे या भागातील लोक शौचासाठी किना-यावर जात असतात. यात पोंबुर्फा-ओळावली पंचायत क्षेत्रात १७६, शिवोली-मार्नासाठी १५३, पेन्ह द फ्रान्ससाठी १४५, शिवोली-सडये १५३ शौचालयांची गरज आहे. तालुक्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या पंचायत क्षेत्रात मात्र उपलब्ध शौचालयांची संख्या समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे.

गोवा सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणेने हा अहवाल तयार केला आहे. स्वयं सेवी संघनेवर हा अहवाल तयार करण्याचे काम सुपूर्द करण्यात आले होते. सदरचा अहवाल तयार असला तरी त्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही अद्याप करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. तयार अहवालातील वस्तूस्थितीची जाण काही पंयायतीना सुद्धा देण्यात आली नसल्याने तयार करण्यात आलेल्या अहवालावर ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

Web Title: In this tehsil, 4631 houses without toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा