गोव्यात आता ‘अ‍ॅप’व्दारे टॅक्सी बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 06:02 PM2018-06-26T18:02:49+5:302018-06-26T18:03:17+5:30

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अ‍ॅप येत्या महिन्यात सुरु होणार आहे. सध्या हे अ‍ॅप प्रत्यक्ष चाचणीसाठी अंतिम टप्प्यावर आहे.

Taxi booking through 'app' now in Goa | गोव्यात आता ‘अ‍ॅप’व्दारे टॅक्सी बुकिंग

गोव्यात आता ‘अ‍ॅप’व्दारे टॅक्सी बुकिंग

googlenewsNext

 पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अ‍ॅप येत्या महिन्यात सुरु होणार आहे. सध्या हे अ‍ॅप प्रत्यक्ष चाचणीसाठी अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील २८00 टॅक्सी चालकांनी हे अ‍ॅप वापरण्यात उत्सुकता दाखवली असून प्रवाशांकडून येणारी मागणी वाढल्यानंतर चालकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरातून गोव्यात पर्यटनासाठी येणाºया पाहुण्यांना प्रवासाचे सोयीस्कर साधन मिळविण्यासाठी हा मोठा दिलासा ठरणारआहे. 

गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर म्हणाले की, ‘गोव्यातील टॅक्सी सेवेसाठीचे हे अ‍ॅप टॅक्सी चालक, पर्यटक आणि स्थानिक अशा सर्वांनाचा लाभदायक ठरणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल घडून येणार आहे. मला खात्री आहे, की गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक या डिजिटल यंत्रणेमध्ये सहभागी होतील आणि याबाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत गोवा मागे राहणार नाही.’

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष आमदार निलेश काब्राल म्हणाले, ‘गोव्यातील दहा लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ‘गोवामाइल्स’ या टॅक्सी अ‍ॅपची माहिती देण्यासाठी आम्ही सार्वजनिक माहिती अभियान राबवणार आहोत. सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला उदंड प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अ‍ॅप पर्यटकही डाउनलोड करतील तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापरतील अशी खात्री आहे.’

 काब्राल म्हणाले, अ‍ॅपवर आधारित ही टॅक्सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल, तसेच टॅक्सीचालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना पूर्णपणे नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्सीचे भाडे भरणे सोपे व सुरक्षित होईल.’ प्रवासाचे रेटिंग करण्याचीही सुविधा आहे. जर चालकाला सातत्याने चांगली श्रेणी मिळविली असेल, तर त्याला चांगला व्यवसाय मिळेल. ‘गोवामाइल्स’च्या प्रवाशांना सर्वोत्तम परवानाधारक आणि नियंत्रित चालकांद्वारे सेवा मिळवून देण्याची खात्री आम्हाला करायची आहे,असे काब्राल म्हणाले. 

‘गोवामाइल्स’चे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे म्हणाले की, ‘गोवामाइल्स प्रवाशांना परवानाधारक तसेच व्यावसायिक टॅक्सीचालक मिळवून देण्यासाठी मदत करील. ग्राहकांना आपण कोणत्या सेवेचे किती पैसे भरत आहोत याची कल्पना येते आणि मोबाइल अपद्वारे कॅब कुठे जात आहे हेदेखिल पाहाता येते.’

 हे अ‍ॅप प्रवाशांना अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मद्वारे मोफत डाउनलोड करता येणार आहे. प्रवाशाने टॅक्सीची विनंती केल्यानंतर सर्वात जवळची टॅक्सी ठिकाण पाहील आणि ग्राहकांपर्यंत पोचेल. त्याचबरोबर यामध्ये ‘लास्ट ड्रायव्हर’नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांना तातडीने चालकांशी कनेक्ट करता येते आणि टॅक्सीमध्ये विसरल्याने राहिलेल्या वस्तू लगेचच मिळवता येतात. 

दरम्यान, चालकांना शिष्टाचार, पर्यटन स्थळांची माहिती, प्राथमोपचार साहित्य, गोव्याची संस्कृती आणि परंपरेची माहिती इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यामुळे त्यांना गोवा टुरिझमचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून वावरता येईल. जीटीडीसी टॅक्सी चालकांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विमा आणि शिष्यवृत्ती योजनाही सुरू करणार असून सर्वोत्तम श्रेणी मिळालेल्या चालकांना दर महिन्याला रोख बक्षिस दिले जाणार आहे. 

 

 

Web Title: Taxi booking through 'app' now in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.