लोकांना सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:12 PM2019-06-06T20:12:26+5:302019-06-06T20:12:51+5:30

पालिका, ग्रामपंचायती, पोलिस खाते यांनी लोकांची कामे व तक्रारी खूप गंभीरपणे घ्यायला हव्यात.

Take action against employees harassing people, Chief Minister's warning | लोकांना सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

लोकांना सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

पणजी : राज्यातील जे सरकारी कर्मचारी लोकांची कामे करणो टाळतात व जे लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आपला पहिला जनता दरबार मंत्रलयात घेतल्यानंतर दिला.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना दर महिन्याला एकदा जनता दरबार घ्यायचे. आपल्याला दोन महिने निवडणूक आचारसंहितेमुळे असा दरबार आयोजित करता आला नाही. गुरुवारी आपण दोन ते तीन तासांत शंभरपेक्षा जास्त लोकांना भेटलो. ग्रामीण भागात प्रशासन कसे चालते ते मला जाणून घ्यायचे होते. लोकांनी अनुभव सांगितले व तक्रारीही केल्या.

पालिका, ग्रामपंचायती, पोलिस खाते यांनी लोकांची कामे व तक्रारी खूप गंभीरपणे घ्यायला हव्यात. लोकांचे अर्ज अनेक ठिकाणी प्रलंबित उरतात. लोकांच्या कामांना सरकारी कर्मचा-यांनी प्राधान्याने न्याय द्यावा. कामचुकार व असंवेदनशील कर्मचारी व अधिका-यांना यापुढे कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मी आताच देऊन ठेवतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुणाच्या घरांचा, कुणाच्या शौचालयांच्या बांधकामांचा तर कुणाच्या पोलिस तक्रारीविषयीचा अनुभव मला पहिल्या जनता दरबारावेळी ऐकायला मिळाला. प्रशासन खूप सक्रिय करण्याची गरज आहे कळून आले. आज शिवराज्यभिषेक दिन आहे. आम्हाला शिवरायांचे सुशासन गोव्यात आणायचे आहे. पोलिस खात्याच्या कामातही सुधारणा करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण रोज सकाळी साखळीतही माझ्या निवासस्थानी गोवाभरातील लोकांना भेटतो, असे सावंत यांनी नमूद केले.

दरम्यान, सर्व मंत्र्यांनी लोकांसाठी दर सोमवारी पर्वरीच्या मंत्रलयात बसावे आणि दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी, असे काही मंत्र्यांना अपेक्षित आहे, असे एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत चर्चाही केली आहे. नोकर भरतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून वेगाने नोकर भरती केली जावी, असाही मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे. प्रशासनाची पकड घेण्यासाठी सर्वानाच थोडा वेळ लागेल, असेही हे मंत्री म्हणाले.

Web Title: Take action against employees harassing people, Chief Minister's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.