टी-२० महिला क्रिकेट : बडोद्याकडून गोवा पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:45 PM2018-01-15T22:45:35+5:302018-01-15T22:45:50+5:30

गेल्या काही सामन्यांत शानदार प्रदर्शन करणा-या गोवा संघाला सोमवारी जबर धक्का बसला. पाहुण्या बडोदा संघाने गोवा महिलांचा २४ धावांनी पराभव केला. बीसीसीआय आयोजित टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा हा पहिला पराभव ठरला.

T20 Women's Cricket: Goa defeats Baroda | टी-२० महिला क्रिकेट : बडोद्याकडून गोवा पराभूत

टी-२० महिला क्रिकेट : बडोद्याकडून गोवा पराभूत

Next

पणजी  - गेल्या काही सामन्यांत शानदार प्रदर्शन करणा-या गोवा संघाला सोमवारी जबर धक्का बसला. पाहुण्या बडोदा संघाने गोवा महिलांचा २४ धावांनी पराभव केला. बीसीसीआय आयोजित टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा हा पहिला पराभव ठरला. स्पर्धेत गोव्याने उत्तरप्रदेशचा पराभव करीत विजयी सलामी दिली होती. 

‘एलीट अ’ गटातील हा सामना गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील अकादमी मैदानावर खेळविण्यात आला. सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शिखा पांडे हिचा हा निर्णय यशस्वी ठरेल, असे वाटत होते. मात्र बडोद्याच्या बी. सुरती (३१) आणि पी. ए. पटेल (२३) या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी केली. २७ चेंडूंत ३१ धावा करणाºया सुरती आक्रमक झाली होती. अखेर तिला रोखण्यात संतोषी हिने यश मिळवले. विनवी गुरवने तिचा उत्कृष्ट झेल टिपला. त्यानंतर वाय. भाटीया हिने २३ धावांची खेळी केली. निशिगंधा मांजरेकर हिने पटेल हिला बाद केले. कर्णधार तरुन्नम पठाण हिने १२ धावा केल्या. तिला निकिता मळीकने बाद केले. त्यानंतर राधा यादवने २२ धावांची नाबाद खेळी केली. तिच्या या धावा बडोद्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे त्यांनी २० षटकांत ५ बाद १२६ या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारली. गोव्याकडून शिखा पांडे, संतोषी राणे, सुनंदा येत्रेकर, निशिगंधा मांजरेकर आणि निकिता मळीक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

प्रत्युत्तरात, गोव्याची सुरुवातच चांगली झाली नाही. सलामी जोडी संजुला नाईक (५) आणि निकिता मलिक (७) झटपट बाद झाल्या. कर्णधार शिखा पांडे हिने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसºया बाजूने सुनंदा येत्रेकर (१) हजेरी लावताच तंबूत परतली. त्यानंतर शिखा पांडे सुद्धा १६ धावांवर झेलबाद झाली. विनवी गुरव (१४) आणि भारती गावकर (२४) यांनी संघर्ष केला; मात्र इतरांच्या अपयशामुळे गोव्याचा डाव १०२ धावांवर संपुष्टात आला. संतोषी राणे (४), प्रतीक्षा गडेकर (६), सुगंधा घाडी (३) या अपयशी ठरल्या. बडोद्याकडून एस. शर्मा हिने ३, एन. वाय. पटेल हिने २ तर तरुन्नम पठाण हिने एक गडी बाद केला. 

संक्षिप्त धावफलक : बडोदा २० षटकांत ५ बाद १२६. (फलंदाजी- सुरती ३१, पटेल २३, भाटीया २३, तरुन्नम पठाण १२, राधा यादव नाबाद २२. गोलंदाजी-शिखा पांडे ३१/१, संतोषी राणे १९/१, सुनंदा येत्रेकर ३३/१, निशिगंधा मांजरेकर १५/१, निकिता मळीक १०/१. गोवा २० षटकांत ९ बाद १०२. (शिखा पांडे १६, विनवी गुरव १४, भारती गावकर २४. एस. शर्मा १४/३, पटेल १२/२, तरुन्नम पठाण १८/१, मोहिते २१/१).

Web Title: T20 Women's Cricket: Goa defeats Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.