समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 06:07 PM2019-07-18T18:07:25+5:302019-07-18T18:14:37+5:30

जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

SO FAR 9 TOURISTS DROWNED IN LAST 6 AND HALF MONTHS IN GOA SEA | समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर

समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर

Next
ठळक मुद्दे जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. मागच्या साडेसहा महिन्यात एकूण 58 जणांचा जीव वाचविण्यात आला असून त्यापैकी 48 जण पर्यटक आहेत.बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - खवळलेल्या समुद्रात जीवरक्षकांनी दिलेला इशारा धुडकावून पाण्यात उतरलेल्या दिल्लीहून आलेल्या दहा पर्यटकांच्या गटातील अनुभव अगरवाल या 20 वर्षीय युवकाला सिकेरी येथे बुडून मृत्यू झाला. पर्यटकाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

बुधवारच्या या दुर्घटनेत बुडणाऱ्या अन्य दोन महिलांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले. आतापर्यंत मागच्या साडेसहा महिन्यात एकूण 58 जणांचा जीव वाचविण्यात आला असून त्यापैकी 48 जण पर्यटक आहेत. यात 25 एप्रिल रोजी वास्को येथे स्कुबा डायव्हिंगसाठी बोटवरुन गेलेल्या 30 पर्यटकांसह, 13 जून रोजी काब द राम येथील दर्यात अडकलेल्या आणि शेवटी नौदलाच्या विमानातून जीव वाचविलेल्या लेफ्ट. शिवम या पुण्यातील नौदल अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मागच्या साडेसहा महिन्यांच्या घटनांचा आलेख घेतल्यास गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांची योग्य ती माहिती नसल्यामुळेच हे अपघात होत असल्याचे उघडकीस आले असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिकेरीच्या ताज्या घटनेतही या दहा पर्यटकांना दर्या खवळल्यामुळे पाण्यात जाऊ नका असा इशारा दिला होता. असे असतानाही हे पर्यटक पाण्यात उतरले. या सर्वाना पाण्यातील जोरदार लाटेने ओढून नेले. मात्र त्यातील सातजण तडीवर आले तर अनुभवसह अन्य महिला सुमारे 25 मीटर आत खेचल्या गेल्या. खरेतर या तिघांनाही जीवरक्षकांनी वर आणले. मात्र अनुभवचा जीव ते वाचवू शकले नाहीत.

13 जून रोजी झालेल्या दुर्घटनाही अशाचप्रकारची असून पुण्यात नौदल अधिकारी म्हणून असलेला लेफ्ट. शिवम हा दक्षिण गोव्यातील काणकोण नजीक असलेल्या काब द राम या समुद्र किनाऱ्यावर उतरला होता. फेसाळलेल्या समुद्राचे फोटो काढण्यासाठी तो तेथील खडकावर चढला होता. मात्र खडक निसरडे असल्याने त्याच्यावरुन पाय घसरून तो पाण्यात पडला. केवळ नौदल अधिकारी असल्यामुळेच तो आपले प्राण वाचवू शकला असे म्हणावे लागेल. शेवटी नौदलाच्या विमानाने त्याचा जीव वाचविला.

14 मे रोजी पाटणो काणकोण येथे 108 रुग्णवाहिका सेवेत डॉक्टर म्हणून कामाला असलेली तमिळनाडूची डॉ. व्ही. रामकुमारी हिलाही अशाचप्रकारे मृत्यू आला होता. या आस्थापनाचा एक गट पिकनीक करण्यासाठी पाटणोला आला होता. त्यावेळी डॉ.  रामकुमारी आणि अन्य फोटो काढण्यासाठी खडकावर चढले असता एका लाटेच्या माऱ्याने त्यातील तिघेजण पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना मच्छीमारांनी वाचविले. मात्र रामकुमारी हिला कुणी वाचवू शकले नाही.

17 फेब्रुवारी रोजी अशाचप्रकारची घटना हरमल येथे झाली होती. प्रशांत अंजानी या 44 वर्षीय बंगळुरुच्या पर्यटकाला खवळलेल्या दर्याच्या लाटेने ओढून नेले होते. तेही छायाचित्र घेण्यासाठीच समुद्रातील खडकावर चढले होते. आतापर्यंत मृत्यू आलेल्या 9 पर्यटकांपैकी 7 जण भारतीय पर्यटक असून त्यातील प्रत्येकी दोघे दिल्ली व बंगळुरुचे तर मध्यप्रदेश, कोल्हापूर व तमिळनाडू येथील एका पर्यटकाचा समावेश आहे. त्याशिवाय दोन विदेशी पर्यटकांनाही मृत्यू आला असून त्यातील एक घटना उत्तर गोव्यातील हणजुणो येथे तर दुसरी घटना दक्षिण गोव्यातील बाणावली येथील आहे.

या दुर्घटनांबद्दल बोलताना दृष्टीच्या जीवरक्षकांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर जी माहिती दिली ती खरोखरच गंभीर अशी होती. तो म्हणाला, पावसाळ्यात समुद्रात कुणी उतरू नये असे फलक समुद्र किनाऱ्यावर लावले असताना आणि आम्ही प्रत्येकवेळी इशारे दिलेले असतानाही केवळ दर्याच्या ओढीने पर्यटक समुद्रात उतरतात. समुद्राच्या लाटांचा अंदाज नसल्याने तसेच समुद्र कुठे सपाट आहे व कुठे खोल आहे याचीही माहिती नसल्याने ते समुद्राचे बळी ठरतात. त्यामुळे गोवा मात्र नाहक बदनाम होतो असे ते म्हणाले.
 

Web Title: SO FAR 9 TOURISTS DROWNED IN LAST 6 AND HALF MONTHS IN GOA SEA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.