पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी एकूण सहा आजी-माजी मुख्यमंत्री रिंगणात उतरणार आहेत. १७ वर्षे मुख्यमंत्रिपद पाहिलेले विद्यमान विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे हे या वेळी दहावी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या १८ रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर हे सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. यापूर्वीच्या पाच निवडणुकांपैकी ते सलग तीनवेळा मांद्रे मतदारसंघातून जिंकलेले आहेत. भाजपसाठी ही या वेळची पहिली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे, ज्या निवडणुकीत स्वत: मनोहर पर्रीकर हे उमेदवार म्हणून किंवा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही रिंगणात नाहीत. ते भाजपचे प्रचाराचे काम पाहतील.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत १९९४ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काही निवडणुका भाजपच्या, तर काही निवडणुका काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्या. २०१२ सालच्या निवडणुकीवेळी कामत हे मुख्यमंत्री होते. या वेळी ते आमदार आहेत. ते आताची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर मडगावमधून लढवणार आहेत. मडगावमध्ये भाजपचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही.
रवी नाईक हे एकेकाळचे मगोपचे नेते. ९०च्या दशकात काँग्रेसमध्ये गेले. नंतरच्या काळात ते भाजपमध्येही जाऊन आले; पण भाजपच्या चिन्हावर त्यांनी कधी निवडणूक लढविली नाही. २०१२ साली ते फोंडा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले. आता पुन्हा रवी नाईक काँग्रेसतर्फे लढतील. त्यांचा सामना मगोप व भाजपशी आहे; पण फोंड्यात अजून भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. २०१२ साली रवी नाईक यांना मगोप-भाजप युतीविरुद्ध लढावे लागले होते.
चर्चिल आलेमाव प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बाणावलीमधून लढतील. चर्चिल ९०च्या दशकात फक्त १९ दिवस मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक पक्ष बदलले. काँग्रेसमध्ये दोनवेळा ते आले व गेले. युगोडेपा, सेव्ह गोवा अशा पक्षांमधूनही ते निवडणुका लढले. २०१२ साली त्यांचा नावेली मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पराभव झाला.
लुईझिन फालेरो यांनी निवडणूक लढवणार नाही, असे यापूर्वी वारंवार सांगितले, तरी या वेळी नावेलीमधून निवडणूक लढवतीलच, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी स्पष्ट केले. २००७ साली पराभूत झाल्यानंतर फालेरो लढले नव्हते. (खास प्रतिनिधी)