पणजी : गोवा सुरक्षा मंच, मगोप आणि शिवसेना यांचे मिळून एकूण ३0 उमेदवार निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे पणजीत राजू सुकेरकर, ताळगावमध्ये माजी महापौर अशोक नाईक आणि सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी मतदारसंघात विनय तारी यांना गोवा सुरक्षा मंचने आपले उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. अधिकृत घोषणा करण्याचा सोपस्कार उद्या सोमवारी पार पडेल.
राजू सुकेरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ते पूर्वी तिसवाडी तालुका संघचालकही होते. गेले अनेक दिवस सुकेरकर यांच्या नावाची चर्चा गोवा सुरक्षा मंचमधून ऐकू येत
होती. शनिवारी येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या बैठकीवेळी सुकेरकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. स्वत: सुकेरकर यांनीही रिंगणात उतरणे त्या बैठकीवेळी मान्य केले. सुकेरकर यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन काम सुरू केल्याचे भाषा सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मगोप विधानसभेच्या एकूण २२ जागा लढवणार आहे. त्यापैकी १९ उमेदवार निश्चित केले आहेत. गोवा सुरक्षा मंच एकूण ९ जागा लढवणार आहे. त्यापैकी सहा ते सात मतदारसंघ हा पक्ष स्वत:च्या चिन्हावर लढवील. फळा (ब्लॅक बोर्ड) हे चिन्ह गोवा सुरक्षा मंचला मिळाले आहे. (खास प्रतिनिधी)