Poetry, Enriched Life Enhanced - Teen Steps | कविता, अभिनयाने जीवन समृद्ध - किशोर कदम
कविता, अभिनयाने जीवन समृद्ध - किशोर कदम

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  अभिनय आणि कविता या दोघांनीही आयुष्य समृद्ध केले. घरात कलेसाठी पोषक नसलेले वातावरण, गरिबी आणि योग्य वयात ध्येयाकडे नसलेला प्रवास एक परिपूर्ण जीवन देऊन गेला. आपल्या मनात असलेला एखाद्या व्यक्तीबाबतचा, हुशारी, रंग-रूप याबाबतचा न्यूनगंड आपल्यामध्ये असलेल्या टॅलेंटची ओळख करून देतो आणि आपला उत्कृष्टाकडील प्रवास होतो. तो प्रवास विलक्षण असतो. किशोर कदम या नावापेक्षाही ‘गारवा’ फेम ‘सौमित्र’च रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.
किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेला मराठी अल्बम ‘गारवा’चे गीतकार सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्याशी स्वस्तिक संस्थेतर्फे आयोजित ‘हितगुज’ या कार्यक्रमात संवाद साधताना सौमित्र यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. साहित्यिक विष्णू वाघ यांनी सौमित्र यांच्याशी संवाद साधला. दोघा कवींमधील संवादाने प्रेक्षकांना भारावून टाकले.
मुंबईच्या खार-कोळीवाडा भागातील बालपणापासूनच्या प्रवासाची आठवण सांगताना किशोर कदम म्हणाले, घरात शिक्षण, कला, सांस्कृतिक क्षेत्राबाबत कोणतेही ज्ञान, मार्गदर्शन नव्हते. अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवावी असे पोषक वातावरणही नव्हते. तरीही समुद्राच्या बाजूला जन्मलेल्या माणसांमध्ये कला आपणच रुजते. माझेही तसेच झाले. समुद्राच्या विशाल कायेने मला उपजतच अभिनय आणि कवित्व या दोन देणग्या दिल्या होतो. ‘माझ्या सोबत समुद्राच्या लाटा येतील, मला शोधाल तेव्हा अनेक वळणवाटा येतील’ असे कवितेच्या ओळींतून आपले व्यक्तिमत्त्व उलगडले.
शालेय वयात गायक ज्ञानेश्वर ढोबरे यांनी सांगितल्याने कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आणि कविता लिहिण्याचा श्रीगणेशा झाला अशी आठवण सांगताना कदम यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणीही उलगडल्या. रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे प्रशिक्षण घेतले. दुबे यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून कसे जगावे याचेही शिक्षण दिले. दुबे यांना भेटल्यानंतर १५ वर्षांचा काळ आयुष्य समृद्ध करणारा ठरला. दुबे यांच्यासोबत नाटक करतानाच श्याम बेनेगल यांनी ‘अंतर्नाद’ या चित्रपटासाठी माझी निवड केली आणि पडद्यासाठीचा अभिनेता जन्माला आला. त्यानंतर ‘ध्यासपर्व’ आणि ‘समर’ या चित्रपटाने नवीन नाव दिले, ओळख दिली, कौतुक आणि प्रसिद्धीही दिली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकातील हरीलाल या पात्राने पुन्हा नवीन अभिनेत्याला जन्म दिला. आणि इथून पुढे नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, कवी, गीतकार अशी वेगवेगळी ओळख निर्माण होत गेली, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

बघ माझी आठवण येते का?
महाराष्ट्रात कदम यांना अभिनेता म्हणविण्यापेक्षाही ‘सौमित्र फेम गारवा’ म्हणून संबोधताना रसिकांच्या डोळ्यात अधिक माया जाणवते. सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचा ‘गारवा’ अल्बम अजूनही गुणगुणला जातो. गारवाने सौमित्र नावाला नवीन ओळख दिली. ‘गारवा’मधील ‘बघ माझी आठवण येते का?’ या कवितेच्या ओळी त्यांनी ऐकविल्या.

विद्यार्थी असताना मी शेवटच्या बाकावर बसायचो, अभ्यासात बराच मागे असायचो आणि कसाबसा पास व्हायचो. कदाचित ढकललो जायचो. त्या वेळी ‘आय एम अनवॉण्डेट’ हा न्यूनगंड भयंकर होता. कुणीतरी माझ्याशी बोलावे, मला ऐकावे अशी खूप इच्छा असायची; पण स्वत:कडे स्वत:ही आकर्षित होण्याएवढे सुंदर व्यक्तिमत्त्व मला लाभले नसल्याने मी खूप निराश असायचो. कुणाशीतरी बोलावे, व्यक्त व्हावे या भावनेने मी कागदांना जवळ केले आणि मोकळ्या होण्याच्या ध्यासाने कवितांमधून स्वत:शी बोलू लागलो, संवाद साधू लागलो, वादविवाद घालू लागलो आणि मी कवी झालो.
- किशोर कदम, कवी, अभिनेते

 


Web Title: Poetry, Enriched Life Enhanced - Teen Steps
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.