पर्रीकर राजीनामा देणार होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:46 PM2018-11-22T20:46:57+5:302018-11-22T20:55:20+5:30

गोवा फॉरवर्डचे अध्यक्षांनी केला खुलासा

Parrikar's resignation and appointment of ministers stopped by BJP leaders: Vijay | पर्रीकर राजीनामा देणार होते, पण...

पर्रीकर राजीनामा देणार होते, पण...

पणजी : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे तसेच स्वत:कडील अतिरिक्त खात्यांचे वाटप करणे यासाठी मनोहर पर्रीकर हे स्वत:च काही महिन्यांपूर्वी तयार झाले होते. मात्र, नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तथा त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी या विषयात हस्तक्षेप केला व विषय थांबला. याचाच अर्थ सगळे काही पर्रीकर यांच्या हाती राहीलेले नाही, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

पत्रकारांनी मंत्री सरदेसाई यांना विचारले असता, सरदेसाई म्हणाले की पर्रीकर जेव्हा कांदोळी येथील इस्पितळात दाखल झाले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:कडील अतिरिक्त खात्यांचे वाटप करण्याचाही विचार केला होता. मात्र भाजपच्या श्रेष्ठींनी त्यात हस्तक्षेप केला. सगळे काही पर्रीकर यांच्या हाती असते असे नाही. आता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दि. 11 डिसेंबरनंतर अतिरिक्त खात्यांविषयी निर्णय होईल असे म्हटले आहे. आपण त्यावरही विश्वास ठेवतो, असे म्हणत सरदेसाई थोडे हसले.

मगो पक्षासंबंधी बोलताना सरदेसाई म्हणाले, की काँग्रेसचे दोन आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर हे काँग्रेसला सोडून गेले हे काँग्रेसला दुखले. वास्तविक काँग्रेसची हानी झाली, मगो पक्षाची काही हानी झाली नाही. पण मगोपने न्यायालयात धाव घेतली. काँग्रेस पक्ष न्यायालयात गेला नाही. मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली, त्यामुळे मला आश्चर्य वाटले पण कदाचित मगोपमध्येही भविष्यात फुट पडू नये म्हणून मगोपने याचिका सादर केली असावी. 

दरम्यान, पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे मंत्री सरदेसाई यांनी कधीच म्हटलेले नाही. मगोपने मात्र मुख्यमंत्रीपदाचा ताबा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा, अशी मागणी चालवली आहे.

Web Title: Parrikar's resignation and appointment of ministers stopped by BJP leaders: Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.