पणजी, दि. 9 - मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री आहेत आणि पणजी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मते आणि पर्रीकर यांचे घटलेले मताधिक्क्य हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक  आहे असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी येथे केले.

राऊत म्हणाले की, पर्रीकर हे खरे म्हणजे पणजीत बिनविरोध निवडून यायला हवे होते पण त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करून बरीच मते मिळवली. काँग्रेसने आणखी थोडा जोर लावला असता व अगोदरच तयारी सुरू केली असती तर पणजीत काँटे की टक्कर झाली असती असे खासदार राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. पणजीत काँग्रेसला बरीच मते मिळाली हे भाजपसाठी धक्कादायक आहे असे राऊत म्हणाले.

येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात उध्दव ठाकरे गोव्यात येऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी शिबिर घेणार आहेत. आम्ही त्याची तयारी करत आहोत. आम्ही गोव्यात 2019 सालच्या लोकसभा निवडणुका लढवणार आहोत असेही राऊत यांनी जाहीर केले. मुंबईप्रमाणेच गोव्यालाही रुग्णवाहिका व मोबाईल दवाखाने  देण्याचा विचार शिवसेना करत आहे असेही राऊत यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.