म्हापसा : नाईट मार्केटमुळे गावात येणा-या पर्यटकांमुळे वाढणारी लोकांची रेलचेल यामुळे गावाचे गावपण नष्ट होणार अशी भिती व्यक्त करून साळगाव पंचायत व साळगाव कोमुनिदादने साळगावमध्ये येणाºया नाईट मार्केट प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. 

लोकांच्या विरोधाला गृहनिर्माणमंत्री तसेच स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. येथील पंचायत तसेच कोमुनिदादच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विरोध दर्शविणारे निवेदन सादर केले होते. त्यावेळी साळगावकर यांनी आपले त्यांना समर्थन व्यक्त केले. 

साळगावपासून कळंगुट हा किनारी भाग अवघ्या किलोमीटरच्या अंतरावर असल्याने या प्रस्तावित नाईट मार्केटचे महत्व वाढू शकले असते. साळगाव पंचायतीला एका रहिवाशाकडून  नाईट मार्केट सुरू करण्यास परवानगी मागणारे पत्र मिळाले. नंतर लगेच साळगाव पंचायतीचे सरपंच लाफिरा रेमिडीयोस इ गोम्स, पंचसदस्य दया कुडणेकर, दया मांद्रेकर, लुकुस रेमिडीयोस, साळगाव कोमुनिदादचे अ‍ॅटर्नी आॅस्टीन ड गामा यांच्या १५ सदस्यीय  शिष्टमंडळाने ७ नोव्हेंबर २०१७ रोज गृहनिर्माण तथा साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांची भेट देऊन त्यांच्याकडे त्यानी नाईट मार्केटला विरोध प्रगट केला आणि सांगितले की असले प्रकल्प गावाचे नाव बदनाम करणार आणि शांती नादू देणार नाही म्हणून अशा प्रकल्पाना गावात थारा देता कामा नये.

या प्रतिनिधीशी बोलताना साळगाव पंचायतीचे सरपंच लाफिरा रेमीडीयोस इ गोम्स यांनी सांगितले की  एका रहिवाशाने एक साधे पत्र लिहून साळगावच्या शेतामधे नाईट मार्केट सुरू करण्यासाठी परवानगी मागीतली आहे. त्याने सविस्तर प्रस्ताव अजुन सादर केलेला नाही. हे पत्र १५ नोव्हेबर २०१७ रोजी होणाºया पंचायत मंडळाच्या बैठकीत मांडले जाईल. लोकाचा  जर या प्रकल्पाला  विरोध असेल तर मी सदर प्रस्तावाला कदापी मान्यता देणार नाही  असे गोम्स यांनी सांगितले.

साळगाव कोमुनिदादचे अ‍ॅटर्नी आॅस्टीन ड गामा यांनी सांगितले की कोमुनिदादच्या  शेतामधे नाईट मार्केट सुरू करण्यासाठी परवानगी मागणी मागणारे पत्र एका रहिवाशाकडून कोमुनिदादला आलेले आहे. साळगाव कोमुनिदाद अशा प्रस्तावाला कोमुनिदादच्या जागेत कदापी मंजुरी देणार नाही असे डा गामा यांनी सांगितले.

मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले की  मला साळगावमध्ये नाईट मार्केटसारखे प्रकल्प नको आहे. मला साळगाव ही वारसा गाव म्हणूनच ठेवायचे आहे. मला साळगावमधे डे मार्केट विकसित करायला पाहिजे जेणेकरुन स्थानिक लोकांना आपला भाजीपाला, फळे व सेल्प हेल्प ग्रुपना आपल्या वस्तू विकायला मिळेल. आपल्याकडे १० रहिवाशानी साळगावमध्ये   रस्त्याच्या बाजूला गाडे घालण्यासाठी परवानगी मागितली आहे. असे गाडे घालण्यास सगळ्याना परवानगी दिली तर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होईल. अशा गाड्यांना डे मार्केटमध्ये समाविष्ट केले जाईल असे साळगावकर यांनी सांगितले.