गोव्यातील विरोधी पक्षनेत्याची साडेचार कोटींची बेहिशेबी संपत्ती, एसीबीकडून निवासस्थान आणि कार्यालयांची झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:33 PM2017-09-16T20:33:05+5:302017-09-16T20:33:18+5:30

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) शुक्रवारी रात्री घाईघाईत प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल केला. यानंतर शनिवारी सकाळी बाबू यांच्या बेतूल येथील निवासस्थानी तसेच केपे व मडगावातील कार्यालयावर छापे टाकले.

Opposition Leader in Goa finds unaccounted money worth Rs 4.5 crore, searches from ACB offices and offices | गोव्यातील विरोधी पक्षनेत्याची साडेचार कोटींची बेहिशेबी संपत्ती, एसीबीकडून निवासस्थान आणि कार्यालयांची झडती

गोव्यातील विरोधी पक्षनेत्याची साडेचार कोटींची बेहिशेबी संपत्ती, एसीबीकडून निवासस्थान आणि कार्यालयांची झडती

Next

पणजी/मडगाव (गोवा), दि. 16 - गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) शुक्रवारी रात्री घाईघाईत प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल केला. यानंतर शनिवारी सकाळी बाबू यांच्या बेतूल येथील निवासस्थानी तसेच केपे व मडगावातील कार्यालयावर छापे टाकले. कवळेकर दाम्पत्याची मिळून एकूण ४ कोटी ७८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले. पत्नी सावित्री यांनाही सहआरोपी केले आहे.

कवळेकर यांची मालमत्ता २००७ ते २०१२ या काळात जास्त वाढली. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा त्यांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ असल्याचे एसीबीचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी पत्रकारांना सांगितले. या काळात ते गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्याच काळात ही वाढ झाल्याचा दावा करून त्यांच्या विरुद्धतक्रार नोंदविली होती. ज्या पाच व्यावसायिक संस्थांमधील मालमत्तेमुळे हा गुन्हा नोंदविला, त्या सर्व पाचही संस्थांच्या सावित्री या संचालक आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी वेर्णा येथील सावित्री पॅकेजीस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स वृषल हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट प्रा. लि, मेसर्स वृषलइस्टेट अ‍ॅण्डइंडस्ट्रीज, वृषल एन्टरप्रायझेस आणि दोनापावल येथील एम. के. एन्टरप्रायझेस या औद्योगिक अस्थापनांचा समावेश आहे.

असुरक्षित कर्ज
बाबू यांची एकूण बेहिशेबी मालमत्ता ही ४ कोटी ७८ लाख असल्याचे जरी अहवालात म्हटले असले तरी बाबू यांनी मुंबई येथील काही कंपन्यांकडून ५ कोटी ५० लाखांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी एसीबीला सांगितले आहे. या कर्जासंबंधीचे व्यवहार ते एसीबीला दाखवू शकले नाहीत.

केरळात १४ भूखंड
कवळेकर यांची गोव्यात आणि गोव्याबाहेरही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा एसीबीच्या प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे. केरळमध्ये त्यांचे १४ भूखंड असल्याचे एसीबीने अहवालात म्हटले आहे.

छाप्याची चौथी वेळ : बाबू कवळेकर
बाबू कवळेकर सध्या धारवाडमध्ये आहेत. छाप्यावेळी त्यांच्या पत्नी सावित्री, अन्य कुटुंबीय घरी होते. बाबू यांच्याशी संपर्क साधला असता, असा छापा टाकण्याची ही चौथी वेळ आहे. आतापर्यंत या संदर्भातील चौकशीला आपण सहकार्यच करत आलेलो आहे. माझी कोणतीही बेहिशेबी मालमत्ता नाही आणि बेकायदा व्यवहारात हात नाही, असे ते म्हणाले.

बाबू कवळेकर यांनी निवडणूक आयोगाला दाखविलेली आणि प्रत्यक्षातील संपत्ती यामध्ये तफावत आहे. त्यामुळे एसीबीने एफआयआर दाखल केलेला आहे. त्यांनी लगेचच राजीनामा देण्याची गरज नाही.
मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा

हे छापासत्र राजकीय इराद्याने आहे. काँग्रेसच्या आमदारांना धमकावून भाजपाकडे ओढून नेण्याच्या कारस्थानाचा हा भाग आहे.
- शांताराम नाईक, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
 

Web Title: Opposition Leader in Goa finds unaccounted money worth Rs 4.5 crore, searches from ACB offices and offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.