गोव्यातील राजकीय अस्थिरतेच्या चर्चेला नितीन गडकरींकडून तूर्त पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 01:05 PM2018-03-21T13:05:16+5:302018-03-21T13:05:16+5:30

खाण प्रश्नाच्या आवरणाखाली गडकरींकडून राजकीय चर्चेलाच प्राधान्य

Nitin Gadkari's full stop in the discussion on the political turmoil in Goa | गोव्यातील राजकीय अस्थिरतेच्या चर्चेला नितीन गडकरींकडून तूर्त पूर्णविराम

गोव्यातील राजकीय अस्थिरतेच्या चर्चेला नितीन गडकरींकडून तूर्त पूर्णविराम

Next

सदगुरू पाटील/पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत आजारावर उपचार घेत असल्याने प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील काही मंत्री, आमदार यांच्याकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जातील व लवकरच गोव्याला नवे मुख्यमंत्री लाभतील अशा प्रकारची जोरदार चर्चा गेला महिनाभर गोव्यात व गोव्याबाहेरही सुरू होती. मात्र केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी खास गोव्यात येऊन व मंत्री, आमदारांशी चर्चा करून सध्या तरी राजकीय अस्थैर्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात यश मिळविले आहे.

गडकरी हे गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न सोडवण्यासाठी गोव्यात आले असे दाखविण्यात आले होते. वास्तविक खनिज खाणींचा विषय हा दिल्लीत बसून सोडवता येतोच पण जर गोव्यातील खाण अवलंबितांचे ऐकून घेणे, खनिज व्यवसायिकांशी संवाद साधणो असा केंद्र सरकारचा प्रामाणिक हेतू होता तर गडकरींऐवजी केंद्राने खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर व खनिज सचिवांनाच गोव्यात पाठवले असते. किंवा गडकरींसोबत तरी तोमर यांना पाठवून दिले गेले असते. मात्र तसे काही झाले नाही. गडकरी यांच्या गोवा भेटीचा हेतू हा राजकीय अस्थैर्याला पूर्णविराम देणे, गोव्यात पर्यायी सरकार घडणार नाही असा संदेश देणे व मुख्यमंत्रीपदी पर्रीकर राहतील असे भाजपा आमदारांना व अन्य पक्षीय महत्त्वाकांक्षी नेत्यांनाही पटवून देणे असाच होता. गोव्यातील राजकीय विश्लेषकांना, निरीक्षकांना व काही मंत्री, आमदारांनाही तसेच वाटते. खाणप्रश्नी अॅटर्नी जनरलांचा सल्ला हा अंतिम असेल असे गडकरी हे गोवा भेट आटोपती घेताना गोमंतकीयांसाठी जाहीर करून गेले.

अॅटर्नी जनरल दिल्लीत असतात. त्यांचा सल्ला दिल्लीत राहूनच घेता आला असता अशीही चर्चा खनिज व्यवसायिकांमध्ये आहे. गोव्यातील खाण मालक वारंवार दिल्लीला जात असतात. त्यांना दिल्लीतच भेट देणो गडकरी यांना शक्य होते. गोव्यातील ट्रक मालक, बार्ज मालक, मशिनरीधारक, खाण कामगार यांना भेटायचे काम गोव्यातील तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळ सल्लागार समितीही करू शकली असती. मात्र गडकरी यांच्या गोवा भेटीचा खरा हेतू हा राजकीय होता. गोव्यातील सरकार स्थिर ठेवायला हवे व मुख्यमंत्री बरे होऊन अमेरिकेहून येतील असा मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांमध्येही संदेश जायला हवा असे वाटल्यानेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठवले. कारण गोव्याचे तिन्ही भाजप खासदार शहा यांनाच दिल्लीत जाऊन गेल्या आठवडय़ात भेटले होते. स्वत: गडकरी यांनीही मंगळवारी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना मला अमित शाह यांनी गोव्यात पाठवल्याचे नमूद केले.

गडकरी यांनी सोमवारची रात्री व मंगळवारी दुपारनंतर सगळ्या राजकीय बैठकाच घेतल्या. भाजपच्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी मुख्यमंत्री बदलणार नाही असे स्पष्ट केले. गोवा फॉरवर्ड, मगोप व अपक्ष मंत्री, आमदारांनाही गडकरी हे स्वतंत्रपणो भेटले. एकंदरीत गडकरी यांनी पत्रकार परिषदेत बोलतानाही सरकार स्थिर असल्याचे व सरकारचे नेतृत्व र्पीकर यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगितले. सरकारमधील काही असंतुष्ट आमदारांची तोंडे तेव्हा पाहण्यासारखी झाली. विरोधी काँग्रेस पक्षही आता दोन महिने तरी सरकार अस्थिर करण्याचा विचार करणार नाही, अशी चर्चा भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: Nitin Gadkari's full stop in the discussion on the political turmoil in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.