गोव्यात हेल्मेटबाबतही आणखी कठोर अंमलबजावणी : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:15 PM2017-12-14T17:15:50+5:302017-12-14T17:17:50+5:30

पणजी : राज्यात वाहतूक शिस्तीच्या बाबतीत कडक उपाययोजना करण्यात येणार असून, वाहन परवाने देण्याच्या बाबतीत सुसूत्रता, विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण या गोष्टींबरोबरच कारवाईही आणखी कडक केली जाईल.

More stringent implementation of helmets in Goa: Chief Minister | गोव्यात हेल्मेटबाबतही आणखी कठोर अंमलबजावणी : मुख्यमंत्री

गोव्यात हेल्मेटबाबतही आणखी कठोर अंमलबजावणी : मुख्यमंत्री

googlenewsNext

पणजी : राज्यात वाहतूक शिस्तीच्या बाबतीत कडक उपाययोजना करण्यात येणार असून, वाहन परवाने देण्याच्या बाबतीत सुसूत्रता, विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण या गोष्टींबरोबरच कारवाईही आणखी कडक केली जाईल. येत्या वर्षात हेल्मेटबाबतही आणखी कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी शून्य प्रहरास राज्यात वाहनांची संख्या बेसुमार वाढत असल्याने अपघातही वाढत आहेत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतुकीच्या बाबतीत कोणतीही बेशिस्त आढळल्यास पोलीस किंवा आरटीओ कारवाई करतात. 2016 साली 3 लाख 63 हजार 776 जणांना दंड ठोठावण्यात आला. चालू वर्षात 30 नोव्हेंबरपर्यंत 4 लाख 69 हजार वाहनधारकांना नियमभंग केल्याप्रकरणी चलन देण्यात आले. हेल्मेटच्या बाबतीतही पोलीस कारवाई केली जाते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास व्हॉट्सअपवर त्यासंबंधीचा फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिसून आलेला आहे. आजपावेतो अशा 410 तक्रारी पोलिसांकडे आल्या. खासगी वाहने टुरिस्ट टॅक्सी म्हणून वापरणा-यांविरुध्दही कडक कारवाई आरंभण्यात आलेली आहे. आतापर्यंत 170 खासगी वाहनधारकांवर कारवाई केली. अपघातांच्या बाबतीत 37 ब्लॅक स्पॉट शोधून काढले असून तेथे आवश्यक ती डागडुजी करण्याचे काम चालू आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, 14-15 वर्षांची शाळकरी मुलेही सर्व नियम धाब्यावर बसवून दुचाक्या चालवितात. कुजिरा शळा संकुलाजवळ गेल्या तीन महिन्यात अशा एकूण 63 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले. पालक म्हणतात, मुले ऐकत नाहीत. संसदेत लवकरच वाहतूक नियम उल्लंघनाबाबत कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा येणार आहे. त्यानंतर अनेक गोष्टी मार्गी लागतील. फोंड्यात वाहन चालविण्याच्या शास्रोक्त प्रशिक्षणासाठी ड्रायव्हिंग ट्रॅक आलेला आहे. वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई सुरू झालेली आहे. काही ठिकाणी खात्याकडे मनुष्यबळ अपुरे पडते वाहतूक विभागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. जे कोणी वाहतुकीचे नियम मोडतात त्यांना महिना, दोन महिन्यांनी सक्तीचे प्रशिक्षण घेणे भाग पाडले जाईल, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: More stringent implementation of helmets in Goa: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.