Meeting of all the MLAs on 16th, Parveers conveyed to Kavlekar | सर्व विरोधी आमदारांची 16 रोजी बैठक, पर्रीकरांकडून कवळेकर यांना ग्वाही

पणजी : विधानसभा मतदारसंघांतील विकासकामे आणि त्या कामांसाठी निधी देणे या विषयाबाबत सरकारने आमदारांमध्ये भेदभाव करू नये, अशी मागणी घेऊन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार येत्या शनिवारी 16 रोजी सर्व सोळाही काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. अशा प्रकारची विरोधी आमदारांची बैठक मुख्यमंत्री प्रथमच घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी गेल्या पंधरवड्यात सर्व सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची बैठक घेतली होती. भाजपासह मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार व मंत्र्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी सत्ताधा-यांच्या ताब्यातील मतदारसंघात प्रत्येकी पंचवीस कोटी रुपयांचा खर्च करण्याची ग्वाही दिली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे सत्ताधा-यांच्या मतदारसंघांमध्ये जलदगतीने व्हावीत या हेतूने मुख्यमंत्र्यांनी ती बैठक घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे काही आमदार नाराज झाले. सरकार विकासकामांबाबत आमच्या मतदारसंघांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका आमदार आलेक्स रेजिनाल्ड व इतरांनी केली होती.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या अपेक्षेनुसार नेते कवळेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेसच्या आमदारांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघातही विकासकामे जलदगतीने होणे गरजेचे आहे व त्यासाठी निधी देखील हवा आहे, असा मुद्दा कवळेकर यांनी मांडला. पर्रीकर यांनी या मुद्द्याची दखल घेऊन आपण येत्या 16 रोजीच बैठक बोलवत असल्याचे जाहीर केले. बैठकीची वेळही मुख्यमंत्र्यांनी निश्चित केली व आपण विकासकामांबाबत भेदभाव करत नाही, असे कवळेकर यांना सांगितले.

दरम्यान, गोवा विधानसभेच्या चार दिवसांच्या अधिवेशनास येत्या 13 रोजी आरंभ होत आहे. त्यामुळे 11 रोजी सायंकाळी चार वाजता काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. वास्कोतील कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ग्रामसभांवर मर्यादा घालण्याचा सरकारचा प्रयत्न, काही विकास प्रकल्पांचे रखडलेले काम वगैरे विविध विषयांवर विधानसभेत आवाज उठविण्याचे काँग्रेसच्या काही आमदारांनी ठरवले आहे. येत्या 11 रोजी आमदारांच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल व विधानसभा सभागृहातील विरोधकांचे व्यवस्थापन ठरविले जाईल, असे काही आमदारांनी सांगितले.