In Jharkhand, a youth was killed in a truck under a wheelchair | ट्रकच्या चाकाखाली सापडून गोव्यात झारखंडचा युवक ठार
ट्रकच्या चाकाखाली सापडून गोव्यात झारखंडचा युवक ठार

मडगाव: गोव्यात एका अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून मूळ झारखंड राज्यातील एक युवक जागीच ठार झाला. राजेश तिरकी (19) असे मृताचे नाव आहे. काल रविवारी रात्री राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील गिरदोली गावात अपघाताची ही घटना घडली. मृत सायकलवरून जात असताना ट्रकची त्याला धडक बसली. यात त्याचे जागीच निधन झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळ काढला. मागाहून रामनगरी भागात अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक सापडला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. ट्रकचालक फरार असून, त्याचा शोध चालू असल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांनी दिली.

मृत तिरकी हा गवंडी हेल्पर म्हणून कामाला होता. चांदरहून माकाझन येथे तो सायकलीवरून जात होता. जीए09 यु 4695 क्रमाकांचा मातीवाहू ट्रकही याच मार्गाने जात होता. रात्री पावणोआठच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. मागाहून मायणा - कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह मोतीडोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागारात ठेवला. काल सकाळी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या 279, 304 (अ) व मोटर वाहन कायदा 134 (अ), (ब) कलमांतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ पर्सी पुढील तपास करीत आहेत.


Web Title: In Jharkhand, a youth was killed in a truck under a wheelchair
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.