बार्देशात भाजपाची वाढती अस्वस्थता; प्रकरण डोईजड होण्याची चिन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 07:13 PM2018-09-25T19:13:28+5:302018-09-25T19:24:26+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलाचे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने बार्देस तालुक्यातून पडसाद उलटायला लागले आहेत.

Increasing discomfort of BJP | बार्देशात भाजपाची वाढती अस्वस्थता; प्रकरण डोईजड होण्याची चिन्हे 

बार्देशात भाजपाची वाढती अस्वस्थता; प्रकरण डोईजड होण्याची चिन्हे 

Next

म्हापसा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलाचे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने बार्देस तालुक्यातून पडसाद उलटायला लागले आहेत. माजी मंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर म्हापशातून वाढता नाराजी सूर सुरुच असताना त्यांच्या जागी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी न देण्यात आल्याने कळंगुट मतदारसंघात नाराजी वाढू लागली असून हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो यांना सुद्धा स्थान न मिळाल्याने हळदोणा भाजपा मंडळात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकंदरीत तालुका स्तरावर भाजपा कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढू लागली असून प्रकरण भाजपाला डोईजड होण्याची शक्यता दिसू लागली आहे.  

सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी निलेश काब्राल तसेच मिलींद नाईक यांचा समावेश केला. झालेल्या फेरबदलानंतर म्हापसा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढत गेली. म्हापशातील भाजपा मंडळ अध्यक्ष दामोदर लांजेकर तसेच महिला भाजपा कार्यकर्त्यांनी डिसोझा यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे सुपूत्र तसेच म्हापसा पालिकेचे नगरसेवक जोशुआ डिसोझा यांची भेट घेवून आपले समर्थन व्यक्त केले. तसेच आमदार डिसोझा जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत राहण्याचे वचनही त्यांना दिले. 

दुस-या बाजूने मंगळवारी म्हापसा पालिकेतील डिसोझा गटाच्या १७ नगरसेवकांनी एकत्रीतपणे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच अमेरिकेत उपचार घेत असलेले डिसोझा गोव्यात परतल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणीही केली. यावेळी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा तसेच इतर जेष्ठ नगरसेवक उपस्थित होते. या सर्वांनी डिसोझा प्रती आपले समर्थन व्यक्त केले. 

डिसोझा यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जागी कळंगुटचे आमदार तसेच उपसभापती मायकल लोबो यांना स्थान दिले जाणार असल्याची अपेक्षा तालुक्यातून सर्वत्र व्यक्त केली जात होती; पण ती फोल ठरल्याने कळंगुट मतदारसंघात सुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. लोबो यांचे समर्थक कळंगुट भागातील टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांनी लोबो यांना स्थान न दिल्या बद्दल नाराजी व्यक्त करुन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते असा त्यांचा दावाही आहे. 

गोव्यात २०१७ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यास लोबो यांचा महत्त्वाचा वाटा होता. सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे आमदारांचे संख्या बळ जमवण्यासाठी लोबो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी झालेल्या तडजोडीमुळे युती पक्षातील इतर आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी लोबो यांनी मंत्रिमंळात स्थान न देता उपसभापतीपद देवून त्यांचे समाधान करण्यात आले होते. त्यावेळी स्थान न मिळाल्याने गप्प बसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दुस-यावेळी तरी त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. ती सुद्धा फोल ठरली. टॅक्सीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लोबो यांनी प्रत्येकवेळी पुढाकार घेतला व त्यांच्या हितासाठी धडपड सुद्धा केली असा त्यांचा दावा आहे. लोबो सध्या लंडनच्या दौºयावर आहेत. 

तालुक्यातील सात मतदारसंघातील तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. हळदोणा या तिस-या मतदारसंघातील भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांची सुद्धा डिसोझा यांच्या जागी वर्णी न लागल्याने या मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते नाराज होवून त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी हळदोण्यात प्रचारासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी टिकलो निवडून आल्यास त्यांना मंत्रिमंडळात स्थान देवू असे आश्वासन जाहीर सभेतून दिले होते. त्यांनाही मंत्रिमंडळातील समावेशापासून वंचित ठेवून त्यांच्या पदरी औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देवून त्यांचा राग शमवण्यात आला होता. जो आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. डिसोझा यांना वगळून त्यांच्या जागी टिकलो यांचा समावेश न झाल्याबद्दल विनय तेंडुलकरांना जाब विचारण्याची तयारी टिकलो यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची जमवा जमवी सुरु झाली आहे. 

एकंदरीत अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा तसेच त्यांच्या जागी लोबो किंवा टिकलो यांचा समावेश न करण्याचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेला निर्णय भाजपाला डोईजड जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातून पक्षावर धोक्याचे ढग जमू लागले असून अमेरिकेत उपचार घेत असलेले डिसोझा आॅक्टोबर महिन्यात परतल्यानंतर तालुक्यातील राजकीय रंग खºया अर्थाने दिसून येईल.  

Web Title: Increasing discomfort of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.