कलियुगातील ‘श्रावण बाळा’ची आईसोबत देशभ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:32 PM2018-10-23T22:32:46+5:302018-10-23T22:33:18+5:30

आईवडिलांना कावडीत घेऊन पदभ्रमंती करणाऱ्या श्रावणबाळाची गोष्ट माहीत आहे; पण कलियुगात म्हैसूर येथील अविवाहित श्रावणबाळ ‘मातृ सेवा संकल्प यात्रा’अंतर्गत आईला स्कूटरवरून देशभ्रमंतीवर घेऊन चालला आहे. त्याचे नाव आहे दक्षिणामूर्ती कृष्णकुमार (वय ३९). कृष्णकुमार हे दहावीपर्यंत शिकलेत.

Illusion with the mother of 'Shravan Balla' in Kaliyuga | कलियुगातील ‘श्रावण बाळा’ची आईसोबत देशभ्रमंती

कलियुगातील ‘श्रावण बाळा’ची आईसोबत देशभ्रमंती

Next

- योगेश मिराशी

पणजी -आईवडिलांना कावडीत घेऊन पदभ्रमंती करणाऱ्या श्रावणबाळाची गोष्ट माहीत आहे; पण कलियुगात म्हैसूर येथील अविवाहित श्रावणबाळ ‘मातृ सेवा संकल्प यात्रा’अंतर्गत आईला स्कूटरवरून देशभ्रमंतीवर घेऊन चालला आहे. त्याचे नाव आहे दक्षिणामूर्ती कृष्णकुमार (वय ३९). कृष्णकुमार हे दहावीपर्यंत शिकलेत.
कृष्णकुमार आई चुडारत्न (वय ७०) यांसोबत त्यांच्या चेतक या स्कूटरवरून (केए ०९ एक्स ६१४३) २०१८ जानेवारीत मकर संक्रांतीनंतर देशभ्रमंतीवर निघाले आहेत. आतापर्यंत त्यांनी २६ हजार ८०० कि लोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. ‘कॉर्पोरेट जगात काम केल्याने माझा संपर्क खूप चांगला बनला. मी लोकविश्वास कमावला. मार्केटिंग क्षेत्रात कामाला होतो, त्यामुळे जनसंपर्क वाढत गेला. त्यामुळे भ्रमंतीवेळी कोणताही त्रास जाणवला नसल्याचे कृष्णकुमार सांगतात.’
लहानपणापासून ते लग्नानंतर आईने म्हैसूर सोडल्यास अन्य कोणतेही ठिकाण पाहिले नव्हते. चार वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. सुट्टीनिमित्त मी घरी आलो होतो. त्या वेळी आईला विचारले की (अम्मा) आई तू कोणती शहरे पाहिली आहेस. तिचे उत्तर एकही नाही असे होते. त्यानंतर मी निश्चय केला की आईला देशभ्रमंती घडवायची. आई केवळ घरातील कामे व घरच्यांसाठी राबली. स्वत:साठी ती कधी जगली नव्हती, हे उद्गार आहेत, कृष्णकुमार यांचे.
ते म्हणाले, १६ जानेवारी २०१८ ला आम्ही भ्रमंतीला सुरुवात केली. वीस वर्षांचा असताना बाबांनी ही चेतक स्कूटर भेट दिली होती. आईवडिलांसाठी मी एकुलता एक मुलगा. ही भ्रमंती करताना बाबाही आमच्यासोबत आहेत ही भावना मनात असते.
पहिल्यांदा आम्ही केरळला गेलो. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात भिमाशंकरपासून ते महाबळेश्वर, औरंगाबाद, अजंटा, पुणे, सांगली, सातारा, सज्जनगड, नरसोबावाडी आदी ठिकाणचे कानाकोपरे बघितले. गावातील गल्लीपासून ते प्रत्येक बोळ्यापर्यंत स्वारी केली. २२ आॅक्टोबरला रात्री गोव्यात आम्ही पोहोचलो. गोव्यातील निसर्गसंपदेसोबत येथील मंदिरांना भेट द्यायची असल्याचे कृष्णकुमार सांगतात. दोन दिवस गोव्यात मुक्काम असेल.

कृष्णकुमार म्हणाले, तेरा वर्षे बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत कॉर्पोरेट टीमचा पुढारी म्हणून काम केले. त्या काळात भरपूर पैसा कमविला. त्यानंतर ठरविले होते की भारतातच राहीन व येथील वातावरणात जगेन. आईच्या नावाने बँकेत खाते उघडले होते व तिच्याच नावावर पैसे जमा करायचो. १४ जानेवारी २०१८ ला राजीनामा देऊन आईची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले.
ही भ्रमंती करून कुणालाच संदेश देण्याचा प्रयत्न करीत नाही. ज्या ठिकाणी भेट देत आहे, तेथील लोकांकडून नव्याने शिकत आहे. मानवता हाच एकमेव धर्म मानतो. प्रत्येक ठिकाणी लोकांचा स्नेहभाव मिळाला. १६ हजारांचा प्रवास केल्यानंतर मुन्नुर ते अक्कलकोट येथे प्रवास करताना घाटामध्ये एकदाच स्कूटरचा पाठीमागचा टायर पंक्चर झाला होता. हाच या प्रवासातील एकमेव कटू अनुभव होता, अशी आठवणही कृष्णकुमार यांनी सांगितली. गोव्यानंतर किनारपट्टी क्षेत्रातील शहरांना भेट देणार असून त्यानंतर पुन्हा म्हैसूरकडे प्रस्थान करणार, असे त्यांनी सांगितले.

अशी केली पूर्वतयारी...
आईने यापूर्वी कधीही इतका लांब प्रवास केला नव्हता. त्यामुळे महिनाभर आईला स्कूटरवर बसून म्हैसूर येथील जवळच्या ठिकाणी भेट द्यायचो. त्यातून तिला तो अनुभव देत गेलो. कालांतराने वाटले की आई आता लांबचा प्रवास करू शके ल. त्यानंतर आईला घेऊन भ्रमंतीवर निघालो, असे कृष्णकुमार सांगतात. ही भ्रमंती करताना आईला तिच्या शाळेतील दोन मैत्रिणीही भेटल्या आणि आठवणींना उजाळा मिळाला.

 
पत्नी, मुलं यासारखी बंधने नको होती. त्यामुळे एकवीस वर्षांचा असतानाच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. भ्रमंतीदरम्यान आम्ही मठ, धर्मशाळा व आश्रमामध्ये आश्रय घेतला. एकदाही हॉटेलमध्ये राहिलो नाही. तिथे जे जेवायला वाढले जायचे ते खाल्ले. त्या ठिकाणी जेवण नसल्यास आम्ही घरातून आणलेला चिवडा दह्यासोबत मिश्रित करून खाल्ला. कधीकधी केळी, सफरचंद, काकडीचे सेवन केले. प्रवासादरम्यान लोक आम्हाला पाहून आमची विचारपूस करायचे. स्वत:हून आम्हाला ठिकाणांची व रस्त्यांची माहिती द्यायचे. हे विश्व ‘वसुधैव कुटुम्बकम’ असल्याने आमचा हा प्रवास आतापर्यंत सुखकर झाला आहे.
- दक्षिणामूर्ती कृष्णकुमार, प्रवासी, म्हैसूर

 
पतीचे निधन झाल्यानंतर मुलगाच माझ्यासाठी सर्व काही. आमचे संयुक्त कुटुंब. पूर्वी घरातील कौटुंबिक कारणामुळे मुलाला जास्त शिकवता आले नाही. तरीही त्याने कधीही आमचा तिरस्कार केला नाही. स्वत: त्याने मला देशभ्रमंतीवर नेण्याचे ठरविले. त्याचा गर्व वाटतो. लग्न कर म्हणून त्याच्या पाठीमागे लागले; पण त्याला माझी सेवा करायची असल्याने त्याने प्रत्येकवेळी नकार दिला. माझ्या प्रकृतीची काळजी घेतो. म्हातारपणात जे प्रेम हवे असते ते कृष्णकुमारने दिले. मी स्वत:ला भाग्यवान समजते. देवाच्या कृपेने प्रवासादरम्यान कोणताच त्रास किंवा पाठदुखीची समस्या जाणवली नाही. सगळ्यांना कृष्णकुमारसारखा मुलगा भेटावा, अशी आशा बाळगते.
- चुडारत्न, कृष्णकुमारची आई
 

Web Title: Illusion with the mother of 'Shravan Balla' in Kaliyuga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.