निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावणे तीन लाखांची दारु, दोन कोटींची रोख जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:44 PM2019-04-18T17:44:08+5:302019-04-18T17:44:49+5:30

अवैध मार्गाने येणारा साडेपाच कोटींचा ऐवज जप्त

huge stock of liquor and 1 75 crore cash seized in goa | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावणे तीन लाखांची दारु, दोन कोटींची रोख जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावणे तीन लाखांची दारु, दोन कोटींची रोख जप्त

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: निवडणूक काळात अवैध मार्गाने येणारी दारु, अंमलीपदार्थ आणि रोखीच्या व्यवहारावर कडक निर्बंध आणण्यात आले असून आतापर्यंत या तिन्ही प्रकारातून दोन कोटींच्या रोख रकमेसह एकूण साडेपाच कोटी रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. 10 मार्चपासून गोव्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्या दिवसापासून 17 एप्रिलपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत जी आकडेवारी हाती लागली आहे. त्यानुसार यात बेकायदेशीर दारुच्या प्रकरणांचा अधिक समावेश असून आतापर्यंत 2.72 कोटी रुपयांची बेकायदेशीर दारु पकडण्यात आली असून त्यापैकी 2.43 कोटींची दारु उत्तर गोवा मतदारसंघात पकडण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थाची एकूण रक्कम 46.80 लाख एवढी असून जप्त केलेली रोख रक्कम 2.09 कोटी इतकी आहे. त्याशिवाय बेकायदेशीर वाळू व्यवसाय आणि मटका व्यावसायिकांवर धाडी घालून सुमारे साडेतीन लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा अवैध रितीने झालेल्या व्यवहारातून आलेला पैसा निवडणुकीत मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच निवडणूक काळात या अशा व्यवहारावर कडक नजर ठेवली जाते. एकट्या दक्षिण गोव्यातच 10 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत बेकायदेशीररित्या दारु विक्रीची 78 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून त्यातून 29.85 लाख रुपयांचा माल पकडला आहे. तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात 18 प्रकरणांची नोंद झाली असून त्यांच्याकडून 6.81 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात अवैधरित्या आलेली 2.09 कोटींची बेहिशोबी रोख जप्त केली आहे. त्यात दाबोळी विमानतळावर एका प्रवाशांकडून 25 लाख रुपयांची जप्त केलेल्या रकमेचाही समावेश आहे. याशिवाय आयकर विभागाने हल्लीच मडगावच्या एका मटका बुकीवर घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर रोख जप्त केली होती.

गोव्यातील व्यावसायिक कर आणि जीएसटी आयुक्त दीपक बांदेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बँकेतून एकाचवेळी 10 लाखापेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची यादी बँकेने आयकर खात्याला द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बेकायदेशीर दारु विक्रीच्या विरोधातही पोलीस व अबकारी खात्याने कडक कारवाई केली असून गोव्याच्या दोन्ही सीमांवरुन आत येणारी वाहने तपासण्यासाठी खास पथकांची सोय केली आहे. यापूर्वी उत्तर गोव्यात बांदा आणि पत्रदेवी चेक नाक्यावर 3.40 लाखांची दारु पकडण्यात आली होती. तर काणकोणच्या पोळे चेक नाक्यावर जवळपास आठ लाखांची दारु पकडण्यात आली होती. याशिवाय म्हापशात केलेल्या एका कारवाईत 15 लाखांची दारु घेऊन जाणारी एक गाडी जप्त केली होती. तर धारगळ येथे तीन गोदामात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल दीड कोटींची दारु पकडण्यात आली होती.


 

Web Title: huge stock of liquor and 1 75 crore cash seized in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा