सद्गुरू पाटील / पणजी
अण्णा हजारे यांचा मी आजही पूर्ण आदर करतो. माझे त्यांच्याशी संबंध चांगले असून माझा अधूनमधून त्यांच्याशी संवादही होत असतो, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गोवा विधानसभेच्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व ४० जागा आप लढवत आहे. त्यातील तीसहून अधिक उमेदवार आपने जाहीरही केले आहेत.
आपच्या प्रचारासाठी केजरीवाल शनिवारी गोव्यात आले होते. रविवारी राजधानी पणजीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या करंजाळे येथे लोकमतशी संवाद साधला.
भाजपाकडे प्रचंड पैसा आहे. पण आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे. गोवा व अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा साठवून ठेवलेला पैसा खर्च करील. मात्र मतदार आम्हालाच मते देतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी या वेळी व्यक्त केला.
दरम्यान, आप सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील बेरोजगार युवकांना दरमहा पाच हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता देऊ, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. शासकीय भ्रष्टाचार संपला की, अशा योजनांसाठी सहज पैसा राहील, असेही ते म्हणाले.