Goa : Shivprasad Joshi and 22 others resigned from Shiv Sena | गोव्यात शिवसेनेत फूट, शिवप्रसाद जोशींसह 24 जणांचा सामूहिक राजीनामा
गोव्यात शिवसेनेत फूट, शिवप्रसाद जोशींसह 24 जणांचा सामूहिक राजीनामा

पणजी - गोव्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  कारण शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह विविध ठिकाणच्या 24 पदाधिका-यांनी शनिवारी (3 मार्च) पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. दरम्यान, ''पक्षविरोधी कारवाया केल्यानं हकालपट्टीचे करण्यात आली, असे वृत्त समोर आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या कारवाया केल्या, याचे उत्तर नूतन राज्यप्रमुख जितेश कामत आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी द्यावे'', अशी मागणी जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली. 

खासदार संजय राऊत यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली होती. त्यात उपराज्यप्रमुख आणि शिवसेनेचे प्रवक्ते जितेश कामत यांना राऊत यांनी बढती देत राज्य प्रमुखपदी बसविले. त्यामुळे शिवेसनेच्या कोणत्याही पत्रकार परिषदेत उपस्थित न राहिलेल्या राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची गच्छंती झाली. मात्र, कामत यांच्या निवडीच्यावेळी खासदार राऊत यांनी आपणास बाजूला का करण्यात येत आहे, याचे स्पष्टीकरण दिले नव्हते.

दोन दिवसांनी आपल्या हकालपट्टीचे वृत्त आल्याने आपणास धक्का बसला, असे जोशी म्हणाले. नूतन राज्यप्रमुख म्हणून निवडल्या गेलेल्या कामत यांनी किती जणांना पक्षात आणले, असा सवालही जोशी यांनी केला. दरम्यान, शिवसेनेच्या विविध ठिकाणच्या पदाधिका-यांनी आपले मत मांडताना कामत आणि प्रभुदेसाई यांच्या कामावर टीका केली. त्याचबरोबर जोशी यांची हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ 21 पदाधिका-यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. 

राजकीय भूमिका स्पष्ट करावीच लागेल!

शिवसेनेत सध्या कामत आणि राखी प्रभुदेसाई यांचेच चालते. त्यामुळे तेथे त्यांच्याशिवाय कोणाचे ऐकले जात नाही. आम्ही शनिवारी बैठक घेणार होतो, ती रविवारच्या शिवजयंती उत्सवाविषयीची होती. मात्र, आम्हाला पक्षातून बाजूला केल्याने आम्ही पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिका-यांची आज सायंकाळी बैठक घेतली जाणार असून, पुढील राजकीय पावले उचलण्यावर चर्चा केली जाईल. आम्ही राजकारणात आलो आहोत, त्यामुळे आम्हाला राजकीय भूमिका स्पष्ट करावीच लागेल. काही दिवसात ते स्पष्ट होईल, असे जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 


Web Title: Goa : Shivprasad Joshi and 22 others resigned from Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.