गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:00 PM2018-09-20T13:00:18+5:302018-09-20T13:00:23+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी होऊन इस्पितळात आहेत आणि त्यांचे दोन मंत्रीही इस्पितळात असताना सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना विरोधी काँग्रेसने सत्ता बदल घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत.

In Goa, efforts to change the government are in motion | गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान

गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान

Next

- सदगुरू पाटील

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी होऊन इस्पितळात आहेत आणि त्यांचे दोन मंत्रीही इस्पितळात असताना सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना विरोधी काँग्रेसने सत्ता बदल घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे गोव्यात दाखल झाले असून त्यांनी काँग्रेसच्या सोळाही आमदारांना संघटीत ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, लुईङिान फालेरो, प्रतापसिंग राणे, रवी नाईक व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हेही गोव्यात नवे सरकार अधिकारावर आणण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. चेल्लाकुमार आणि काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झालेली आहे.

पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीत गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक तथा मगोप हे दोन घटक पक्ष आहेत. मात्र पर्रीकर इस्पितळात असताना व त्यांनी नेतृत्व सोडण्याची तयारी दाखवलेली असताना फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक ह्या दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. मगोपला शह देण्यासाठी गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी तिघा अपक्ष आमदारांना स्वत:च्याबाजूने वळविले व सहा आमदारांची मोट बांधली आहे. त्यानंतर मगोप खूप दुखावला गेला व या पक्षाने पर्रीकर यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा ठेवावी पण मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता ताबा ज्येष्ठ मंत्र्याकडे म्हणजे मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्यावा असा आग्रह धरला आहे.

काँग्रेसने या राजकीय अस्थिरतेचा लाभ उठविण्याचे ठरविले असून राज्यपाला मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावाही काँग्रेसने केला आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेस हा सोळा आमदारांचा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाकडे चौदा आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड व मगोप या दोन्ही पक्षांना व अपक्षांना काँग्रेसकडून ऑफर्स दिल्या जात आहेत. अजून घटक पक्षांनी काँग्रेसच्या ऑफर्सना प्रतिसाद दिलेला नाही. मात्र प्रसंगी मगोप आणि दोन अपक्ष आपल्याबाजूने येऊ शकतात असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. चेल्लाकुमार हे तातडीने गोव्यात दाखल झाल्याने नवी जुळवाजुळव सुरू होईल, असे राजकीय गोटात मानले जात आहे. 

दरम्यान, गोव्याच्या तिघा खासदारांशी व भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांशी बुधवारी सायंकाळी एकत्र बैठक घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोव्यातील राजकीय स्थिती पूर्ण कळाली आहे. शहा हे गोव्यात काँग्रेसकडे सत्तासुत्रे जाणार नाहीत याची सर्व प्रकारे काळजी घेईल. त्यासाठी प्रसंगी कोणतीही राजकीय तडजोड केली जाईल, असे गोवा भाजपच्या आतिल गोटात मानले जात आहे. घटक पक्षांना खूष ठेवण्यासाठी सरकारमध्ये नवे उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले जाऊ शकते. 

Web Title: In Goa, efforts to change the government are in motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.