'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:19 PM2018-02-13T12:19:33+5:302018-02-13T12:19:48+5:30

गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

Goa is in controversy over comment on tourist | 'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे', पर्यटकांवरील टीकेमुळे गोवा पुन्हा वादात

Next

पणजी : पृथ्वीच्या तळातील मळ उत्तर भारतीय पर्यटकांच्या रुपात गोव्यात येतो अशा प्रकारची टीका पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही काही पर्यटकांना दोष देण्याची भूमिका घेतल्यामुळे गोवा राज्य पुन्हा एकदा देशभर नकारात्मक कारणांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. गोवा पुन्हा वादात सापडले आहे पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा पक्ष वादापासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे.

बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणो मंत्री सरदेसाई यांच्या भूमिका दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहेत. अगोदर त्यांनी विधानसभेसमोर स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारायला हवा अशी भूमिका घेतली. त्यास सत्ताधारी भाजपाने व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आक्षेप घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तर सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासह अन्य पुतळ्य़ांचेही विषय विधानसभेत येणारच नाहीत याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी त्यांना सादर झालेले ठराव बाद ठरविले. मंत्री सरदेसाई यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. तथापि, भविष्यात कधी तरी नैसर्गिकपणे सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच अशी भूमिका सरदेसाई यांनी घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीत नमते घेणे पसंत केले आहे. 

उत्तर भारतीय पर्यटक गोव्यात घाण करतात, ते गोव्यात दुसरा हरियाणा तयार करू पाहत आहेत अशी टीका मंत्री सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच करून जास्त पैसा खर्च करणारेच पर्यटक गोव्यात यायला हवेत असा मुद्दा मांडला होता. त्यावरून सरदेसाई यांच्या या भूमिकेवर देशभरातून टीका सुरू झाली. गोव्याच्या पर्यटन उद्योगानेही मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचे स्वागत केले नाही. आपण गोमंतकीयांचीच भावना व्यक्त केली आहे, कारण बसच्या खिडकीमधून एक पर्यटक रस्त्यावर लघवी करत असल्याचा व्हीडीओ आपण पाहिला होता, असे सरदेसाई म्हणाले. काही गोमंतकीयांनी मंत्री सरदेसाई यांच्या भूमिकेला सोशल मिडियावरून पाठींबा दिला. विरोधी काँग्रेस पक्षाने व आम आदमी पक्षाने सरदेसाई यांच्यावर टीका केली व ही विधाने भाटकारशाहीची लक्षणो असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर म्हणाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व मंत्री सरदेसाई यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री सरदेसाई यांनी आता थोडी वेगळी भूमिका मांडत हरियाणातही काही लोक चांगले आहेत असे नवे विधान केले आहे. आपण सर्व पर्यटकांना दोष देत नाही. फार थोडे पर्यटक गोव्यात नागरी शिस्त पाळत नाहीत, त्यांच्याविषयीच आपण बोललो होतो असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात जे पर्यटक गोमंतकीयत्व सांभाळणार नाहीत, त्यांना आम्ही गोव्यातून माघारी पाठवू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले. त्यावरही टीका सुरू आहे. गोव्यात येऊन काही पर्यटक अंमली पदार्थाचा व्यवसाय करतात असे  आजगावकर यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Goa is in controversy over comment on tourist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा