अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 06:17 PM2019-02-11T18:17:36+5:302019-02-11T18:18:01+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले.

Goa : absence of enlivenment in Amit Shah's rally? | अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

Next

पणजी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले. धक्कादायक म्हणजे शहा यांचे भाषण सुरू झाले व मोठ्या संख्येने लोक माघारी जाण्यास आरंभ झाल्याचे आढळून आले. व्यासपीठावरील अनेक आमदारांच्याही हे लक्षात आले.

भाजपाच्या कोअर टीमच्या एका सदस्याने लोकमतला सांगितले, की शनिवारी अनेक ठिकाणी विवाह सोहळे होते आणि त्यामुळे लोकांची गर्दी कमी झाली. 30 ते 40 हजार गर्दी सामावून घेण्याची ज्या स्टेडियमची क्षमता आहे, त्या स्टेडियमवर फक्त 15 हजार लोक जमले. हे भाजपाचे बूथ कार्यकर्ता संमेलन आहे, असे जरी सांगितले गेले तरी, प्रत्यक्षात त्या संमेलनामध्ये कार्यकर्त्यांपेक्षा अन्य लोकच जास्त होते. कथित कार्यकर्ता संमेलनाचे रुपांतर भाजपाने शहा यांच्या जाहीर सभेत करून टाकले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चार मिनिटांचे भाषण झाले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच जोश आला पण शहा बोलायला उभे राहिले आणि त्यांचे पहिले वाक्य सुरू होताच पर्रीकर हे व्यासपीठावरून उतरत आपल्या निवासस्थानी निघून गेले. आजारपणामुळे ते व्यासपीठावर जास्त वेळ बसू शकले नाही. पर्रीकर जाताच गर्दीतील बरेच लोक माघारी जाऊ लागले. यावेळी व्यासपीठावरील एका नेत्याने भाजपाच्या एका मंत्र्याला तुम्ही आणलेले लोक माघारी जाऊ लागले असे खासगीत सांगितले. तेव्हा ते आपण आणलेले लोक नव्हे, आपले लोक अजून बसून आहेत असे उत्तर त्या मंत्र्याने दिले.

अमित शहा यांच्या सभेविषयी लोकांत क्रेझ नव्हती. पंतप्रधान मोदी यांची सभा असती तर जास्त गर्दी झाली असती व शेवटपर्यंत सगळे लोक थांबले असते असे एका आमदाराने सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर हे भाषण करून माघारी गेल्यामुळे गर्दीमध्ये चुकीचा संदेश गेला अशी प्रतिक्रिया रविवार व सोमवारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांत  व्यक्त झाली. 

काही आमदार आणि मंत्र्यांनी मतदारसंघातून जास्त लोक आणले नाही. काहीजणांनी आपण दीड ते अडीच हजार लोक मतदारसंघातून आणू असे भाजपाच्या कोअर टीमला सांगितले होते. प्रत्यक्षात पाचशे ते सहाशेच आणले. सत्तरी तालुक्यातूनही यावेळी जास्त गर्दी आली नाही. भाजपाने सभेला आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि खाद्य पदार्थ खाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली होती. गर्दीमध्ये शिस्तही होती. स्टेडियमवरून मात्र खाली येऊन बसण्यास बऱ्याचजणांनी नकार दिला. ते स्टेडियममध्येच बसून राहिले. यामुळे एकाबाजूने सभास्थळी खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या. अमित शहा यांचे भाषण गर्दीला चार्ज करू शकले नाही. जर त्यांनी खनिज खाणींचा प्रश्न ठराविक दिवसांत सुटेलच असे जाहीर केले असते तर गर्दीवर थोडा परिणाम झाला असता अशी प्रतिक्रिया खाणपट्ट्यातील  भाजपाचे काही आजी-माजी आमदार व्यक्त करत आहेत. श्रीपाद नाईक यांच्या भाषणात दम नव्हता. सुलक्षणा सावंत यांचे भाषण प्रभावी ठरले. 

Web Title: Goa : absence of enlivenment in Amit Shah's rally?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.