ऑनलाइन लोकमत 

पणजी. दि. 5 -  एक कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर,  सचिव बाळू फडके आणि माजी खजिनदार अकबर मुल्ला यांना पणजी प्रधान सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. 
सर्व चारही संशयितांना पणजी सत्र प्रधान न्यायाधीश भारत देशपांडे यांनी सशर्त जामीन मंजूर करताना १ लाख रुपयांच्या बॉंडची अट घातली आहे. तसेच तपास अधिकाºयाने चौकशीसाठी बोलावले असता हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या या निवाड्यामुळे संशयितांना मोठा दिलासा मिळाला असून अटकेच्या टांगत्या तलवारीपासून सुटका मिळाली आहे. 
जीसीएला भारतीय क्रिकेट मंडळाकडून मिळालेली १ कोटी रुपये रक्कम संशयितांनी हडप केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदविण्यात आला होता.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा धनादेश शिरोडा अर्बन कोअपरेटीव्ह पतसंस्थेत जमा करून तो नंतर इतर बँकेतून वठविण्यात आला होता. यात चेतन देसाई आणि अकबर मुल्ला यांची महत्त्वाची भुमिका असल्याचा दावा आर्थिक गुन्हा विभागाने केला आहे. 
दरम्यान जीसीए घोटाळा प्रकरणात यापूर्वीच दयानंद नार्वेकर वगळता इतर संशयितांना अटक झाली होती. नेमका हाच मुद्दा संशयितांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी उपस्थित केला होता. त्यांना पुन्हा अटकेची गरज नाही असाही त्यांचा युक्तिवाद होता. सर्व सुनावण्या झाल्यानंतर याचिकादाराची याचिका ग्राह्य धरण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.